सांगली : बालाजीनगर येथील बहरणाऱ्या बालोद्यानाला उजाड बनविताना येथील काही सोसायटी सदस्यांनी तीन वर्षे जुन्या व पूर्ण वाढलेल्या झाडांवर कुऱ्हाड चालविली. फांद्या तोडण्यास परवानगी घेऊन जमिनीपासून झाडे उद्ध्वस्त करण्यात आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
महापालिकेच्या उद्यान अधीक्षकांनी याची गंभीर दखल घेतली असून, कारवाईच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
कुपवाडजवळील बालाजीनगरात सोमवारी हा प्रकार घडला. मंगळवारी सकाळी परिसरातील नागरिक, सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी याबाबत संताप व्यक्त करतानाच महापालिकेच्या कारभाराबाबतही नाराजी व्यक्त केली.
उद्यानाची जबाबदारी ज्या सोसायटीवर दिली होती त्या सोसायटीच्या काही सदस्यांनीच झाडांची कत्तल केल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
महापालिकेकडे या सदस्यांनी फांद्या तोडण्याची परवानगी घेतली, मात्र प्रत्यक्षात संपूर्ण झाडेच तोडून टाकण्यात आली. सुमारे १५ ते २० झाडांची कत्तल झाल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले.
सावली गायब, उद्यानाची वाट
दाट सावली देणाऱ्या झाडांची कत्तल केल्याने उद्यानातील सावली गायब झाली आहे. त्यामुळे उद्यानात सतत वावर असणाऱ्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
बालाजीनगरच्या वृक्षतोडीचा पंचनामा केला आहे. संबंधितांनी केवळ फांद्या तोडण्याची परवानगी मागितली होती. त्याची परवानगी घेऊन पूर्ण वृक्षतोड केल्याने आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहोत, असे महापालिकेचे उद्यान अधीक्षक गिरीश पाठक यांनी सांगितले.