सांगली : सांगलीत शुक्रवार ते रविवारदरम्यान (दि. २९ ते ३१ डिसेंबर) बारावे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन आयोजित केले आहे. यामध्ये राज्यभरातून १५ हजार वारकरी सहभागी होणार आहेत.
वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी ही माहिती दिली.
संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, विधान परिषदेचे माजी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, उद्योगमंत्री उदय सामंत, केंद्रीय मंत्री भगवंत खुबा, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षपदी माजी मंत्री बबनराव पाचपुते व स्वागताध्यक्षपदी कामगारमंत्री सुरेश खाडे आहेत.
शुक्रवारी सकाळी चारशेहून अधिक दिंड्यांच्या सहभागाने दिंडी सोहळा निघेल. रोज सायंकाळी आजरेकर महाराज, वास्कर महाराज, देहूकर महाराज यांच्या फडांची कीर्तने होणार आहेत. गुरुबाबा महाराज औसेकर यांचे चक्रीभजन, सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज यांचे प्रबोधनपर भजन, चैतन्य महाराज कबीर बुवा यांची अभंगवाणी होणार आहे.
अंधश्रद्धा व जादूटोणा विषयावर मुक्ता दाभोलकर, दिनेश डिंगळे व प्रा. डी. यू. पवार यांचा परिसंवाद होणार आहे. संत परंपरेचा आढावा विषयावर हभप चकोर महाराज बावीसकर, प्रवीण मोरे, सिद्धार्थ खरात यांचा दुसरा परिसंवाद होईल. देशाची प्रगती, सामाजिक स्थिती यातून पत्रकारिता या विषयावर श्रीराम पवार, मनोज भोयर व रवी आंबेकर यांचा तिसरा परिसंवाद होणार आहे.
संमेलनाचा समारोप आमदार जयंत पाटील, अनिल बाबर, सुमनताई पाटील आदींच्या उपस्थितीत होईल. माजी महापौर सुरेश पाटील, परिषदेचे जिल्हाध्यक्ष दीपक महाराज माळी हेदेखील उपस्थित राहणार आहेत.
यांचा विठ्ठल पुरस्काराने सन्मान
श्रीमंत सरदार उर्जितसिंहराजे शितोळे, मनोहर महाराज आवटी, तात्यासाहेब महाराज वासकर, भानुदास महाराज ढवळीकर, अण्णासाहेब डांगे, बापूसाहेब पुजारी, गुरुनाथ महाराज कोटणीस यांना विठ्ठल पुरस्कार दिले जाणार आहेत