तमिळनाडूतील साजरागडावर मराठी शिलालेख, साताऱ्यातील तरुणांचे दक्षिण भारतात संशोधन

0
100

सातारा : साताऱ्यातील दुर्गवेड्या तरुणांच्या प्रयत्नातून तामिळनाडू राज्यातील साजरागडावर असणारा मराठी शिलालेख उजेडात आला आहे. हा शिलालेख चार ओळींचा असून, इतिहास अभ्यासकांनी त्याचे वाचनही केले आहे.

तामिळनाडूतील वेलूर प्रांतातील पंचवीस किल्ले शिवरायांच्या ताब्यात होते. त्यात साजरागड अन् गोजरागड या किल्ल्यांचा समावेश आहे. हे किल्ले सध्या अर्काट जिल्ह्यात आहेत.

त्यातील साजरागड या किल्ल्यावर काही वर्षांपूर्वी पुसेगाव (ता. खटाव) येथील अनिकेत वाघ व अमर भाऊ या इतिहास अभ्यासक असलेल्या युवकास छत्रपती शिवरायांचे शिल्प आढळले होते. त्यानंतर नुकतीच खटाव येथील इतिहास अभ्यासक कुमार गुरव व त्यांच्या सहकाऱ्यांनी दक्षिणेतील गडकोटांची अभ्यास मोहीम यशस्वी केली.

यावेळी त्यांनी किल्ल्यावरील अन्य शिल्पांचा शोध घेतला तेव्हा पहिल्या अन् दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या मध्यभागी असलेल्या पहारेकऱ्यांच्या देवड्यांच्या भिंतीवर एक शिलालेख आढळून आला.

या शिलालेखाभोवती काटेरी झुडपे वाढली होती. आजूबाजूला मोठ्या प्रमाणात मातीही होती. दोन- तीन तासाच्या सफाईनंतर तो शिलालेख वाचण्यायोग्य झाला. त्याचे वाचन करून तो शिलालेख अभ्यासकांना पाठवण्यात आला.

इतिहास अभ्यासक अनिल दुधाणे, अनिकेत वाघ यांनी शिलालेखातील मजकुरावर काम केले. ‘जिज्ञासा मंच’चे नीलेश पंडित, प्रवीण भोसले यांचेही या शिलालेखाबाबत महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. या शोध मोहिमेत कुमार गुरव (खटाव) यांच्यासह सूरज नाळे (जाधववाडी, ता. कोरेगाव), नीलेश सुतार (झगलवाडी, ता. खंडाळा) यांनी सहभाग घेतला.

शिलालेखावरील माहिती अशी..

युवकांनी शोधलेला हा शिलालेख देवनागरी लिपीत आहे. तो चार ओळींचा आहे. त्यातील मजकूरानुसार रवळोजी जाधव यांची गडावर हवालदार म्हणून नेमणूक करण्यात आली असल्याचे स्पष्ट होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here