सांगली : ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी मंगळवारची बैठक रद्द झाली आहे. प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी बुधवार दि. २७ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलविली आहे.
या बैठकीमध्ये ऊस दराची कोंडी फुटण्याची शक्यता आहे.
आठ दिवसांपूर्वी ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य संघटनांचे प्रतिनिधी, साखर कारखानदारांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी बैठक घेतली होती.
या बैठकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखानदारांना अंतिम प्रस्ताव दिला. या प्रस्तावांमध्ये गतवर्षीचा साखर उतारा साडेबारा टक्केपेक्षा अधिक असल्यास पहिली उचल तीन हजार २५० रुपये, साडेबारा पेक्षा कमी असल्यास तीन हजार २०० आणि ज्या कारखान्यांचा साखर उतारा दहा टक्के आहे त्या कारखान्यांनी ३ हजार १०० रुपये असा शेवटचा प्रस्ताव ठेवण्यात आला.
यामध्ये जिल्ह्यातील कारखानदारांनी गतवर्षी तुटलेल्या उसापोटी तीन हजार रुपयांपेक्षा जास्त दर दिला आहे, त्यांनी ५० रुपये व ज्या कारखान्यांनी ३००० च्या आत दिला आहे, त्यांच्याकडून शंभर रुपये देण्याचा प्रस्ताव मान्य केला.
पण, चालू गळीत हंगामातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलेल्या प्रस्तावांवर विचार करून निर्णय घेण्याचे साखर कारखानदारांनी सांगितले होते.
त्यानुसार दि. २६ डिसेंबरला पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन अंतिम निर्णय घेण्याचे ठरले होते. पण, दि. २६ डिसेंबरपासून जिल्हाधिकारी रजेवर गेले आहेत. म्हणून मंगळवारची बैठक रद्द झाली.
बुधवार दि. २७ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी साखर कारखानदार आणि संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलविली आहे. या बैठकीत ऊस दराची कोंडी फुटेल, असा प्रशासनाचा अंदाज आहे.