यंदा खरिपात उशिरा आलेला पाऊस आणि त्यामुळे सोयाबीन, मका यासारख्या पोल्ट्री खाद्यांच्या किंमतीत झालेली वाढ यामुळे देशातील पोल्ट्री व्यावसायिकांपुढे आव्हाने उभी राहिली असली, तरी पुढील वर्षी म्हणजेच २०२४मध्ये पोल्ट्री उद्योगातील महसुलात ८ ते १० टक्के वाढीची शक्यता या क्षेत्रातील विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.
त्यामुळे आगामी वर्ष हे पोल्ट्रीसाठी चांगले वर्ष असणार आहे.
विश्लेषण व गुंतवणूक क्षेत्रातील अग्रेसर असलेल्या आयसीएआरने यासंदर्भात आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात २०२४ मध्ये पोल्ट्री उद्योगातील महसुलात ८ ते १० टक्के वाढ होण्याचे भाकित केले आहे. या अहवालानुसार चालू वर्षी पक्ष्यांची उपलब्धता चांगली होती. तसेच लग्नसराईसारख्या हंगामात मागणी आणि पुरवठ्याचे गुणोत्तर टिकून होते.
यंदा मका आणि सोयाबीनच्या कुक्कुट खाद्य किंमतीत मोठी वाढ झाली. मात्र येणाऱ्या काळात ही यात घट होऊन ही वाढ केवळ दहा टक्केच असेल आणि कुक्कुट खाद्याच्या किंमती स्थिरावतील.
याशिवाय पोल्ट्रीतील इतर निविष्ठांच्या किंमती स्थिर राहणार असल्यानेही त्याचाही सकारात्मक परिणाम पोल्ट्री उद्योगावर होऊन या उद्योगाची वाटचाल स्थिर वाढीकडे राहील असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
अलीकडच्या काही काळात वाढत्या लोकसंख्येनुसार पोल्ट्री उत्पादनाची मागणी वाढलेली आहे. तसेच लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलत असून शहरी भागातील लोकाचा कल पोल्ट्री फास्टफूडकडे वाढला आहे. हा कल असाच राहण्याची अपेक्षा व्यक्त करत त्यामुळे या उद्योगाला चांगले दिवस येतील असे निरीक्षणही आयसीएआरच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
अमेरिकेतून पोल्ट्रीचे अन्नपदार्थ आयात करण्यासंदर्भात भारतात बंदी होती. या संदर्भात दीर्घ वाद सुरू होता. मात्र सप्टेंबर २३ मध्ये भारतात अमेरिकेतील पोल्ट्री उत्पादनांका आयातीसाठी परवानगी मिळाली.
त्याचा परिणाम देशातील छोट्या आणि मध्यम पोल्ट्री व्यावसायिकांवर होऊ शकतो अशी शंकाही या अहवालात उपस्थित करण्यात आली आहे. दरम्यान जागतिक पशु आरोग्य संघटनेकडून (डब्ल्यूओएएच) भारतीय पोल्ट्री उद्योगांना बर्ड फ्लू मुक्त असण्याचे स्व-घोषणापत्र देण्यास मंजूरी देण्यात येत आहे. त्याचा परिणाम मध्यम ते दीर्घ कालावधीसाठी बाजारात आपले स्थान टिकवून ठेवण्यात आणि नवीन बाजारपेठ काबीज करण्यात या उद्योगांना होणार आहे. त्यातूनही पोल्ट्री उद्योग वाढण्याची शक्यता आहे.