स्वर्गीय सुखाची अनुभूती देणारे निसर्ग सौंदर्य राधानगरी

0
215

कोल्हापूर प्रतिनिधी : प्रियंका शिर्के पाटील

निसर्गाने मानवाला भरभरून वरदान दिले आहे. माणसाची घेण्याची शक्ती, कुवत संपेल परंतु निसर्गाचे हात रिते होत नाहीत. हिरवेगार डोंगर झाडे, वेली, पशु, पक्षी काय काय बघावे आणि कितीदा बघावे.

निसर्ग सौंदर्य बघून डोळ्याचे पारणे फिटते पण वारंवार पहात रहावे डोळ्यात मनात साठवत ते सौंदर्य हृदयात जतन केले जाते. भारतातील पश्‍चिम घाटात राधानगरी म्हणजे दाजीपूर अभयारण्य, सह्याद्रीमधील दक्षिण व उत्तरेकडील पश्‍चिम घाटाला जोडणारा हा अतिशय महत्त्वाचा जंगलपट्टा आहे.

कोल्हापूरचे संस्थान खालसा होण्यापूर्वी संस्थानिकांची व शिकारी प्रेमींची खास सोय म्हणून दाजिपुरचे जंगल आरक्षित होते. कालांतराने कोल्हापूर संस्थान महाराष्ट्रात विलिन झाले आणि 1958 मध्ये दाजिपूर जंगल गवा अभयारण्य झाले. दाजिपूर अभयारण्याची महाराष्ट्रातील सर्वात जुने अभयारण्य म्हणून नोंद झाली आहे.

येथील वैशिष्ट्य म्हणजे दुर्मिळ होत चाललेला पट्टेरी वाघ व बिबळ्या, फक्त पश्‍चिम घाटातच आढळणारे लहान हरिण (पिसोरी), जगात केवळ पश्‍चिम घाटात आढळणाऱ्या दहा प्रजातींचे पक्षी येथे बघायला मिळतात.

त्याचबरोबर ऑलिव्ह फॉरेस्टस्नेक, एरिक्स व्हिटेकरी पाईट वेली, शिल्डटेल या दुर्मिळ सापांची नोंद देखिल या अभयारण्यातच झाली आहे. दाजिपूरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 121 प्रजातीची फुलपाखरे.

ग्रास ज्युवेल 15 मी. मी. च्या सर्वात लहान फुलपाखारापासुन ते सदन वर्डविंग या भारतातील 190 मी.मी.चे सर्वात मोठे फुलपाखरू राधानगरीत आढळतात. हजारो फुलपाखरे अशी एकत्र जमून समुहाने स्थलांतर करतात. त्यात ब्ल्यू टायगर, ग्लॅासी टायगर, स्ट्राईप टायगर ही फुलपाखरे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात येथे येतात.

35 प्रकारच्या वन्य जीव संपदेत गवा, सांबर, भेकर, रानकुत्रा, अस्वल, चौसिंगा, रानडुक्कर, साळींदर, उदमांजर, खवलेमांजर, शेकरू, ससा, लंगूर याच बरोबर वटवाघळाच्या तीन जाती आढळतात.

पक्षी निरीक्षकांसाठी राधानगरी वन्यजीव अभयारण्य एक स्वर्गच आहे. राधानगरी अभयारण्यात आजमितीस 235 प्रकारच्या पक्षी प्रजातींची नोंद झालेली आहे. यामध्ये ग्रेट पाईड हॉर्नबील, निलगीरी वूड पीजन, मलबार पाईड हॉर्नबील, तीन प्रकारची गिधाडे या संकटग्रस्त प्रजातींच्या पक्षांचा समावेश आहे. अभयारण्यातील सांबरकोंड, कोकण दर्शन पॉईंट, सावर्दे, काळम्मावाडी धरण, उगवाई देवी मंदीर ही पक्षी निरीक्षणासाठी उत्तम ठिकाणे आहेत.

वनस्पती संपदा म्हटले तर भारतातील राधानगरी अभयारण्याचे महत्त्व म्हणजे निमसदाहरीत वर्षाअखेर पानगळीच्या मिसळलेल्या जंगल प्रकारामुळे असंख्य झाडांच्या प्रजाती येथे आढळतात.

डोंगरातील दऱ्याखोऱ्यातील घनदाट जंगल, विस्तीर्ण सडे व गवताळ कुरणात असंख्य प्रजातींचे वृक्ष, वेली, झुडपे, ऑर्किडस्, फुले, नेचे, बुरशी आढळतात.

अभयारण्यात 1500 पेक्षा जास्त फुलझाडांच्या प्रजाती आढळतात. भारतातील द्वीपकल्पामधील प्रदेशनिष्ठ 200 प्रजाती येथील भागात आहेत. 300 पेक्षा जास्त औषधी वनस्पतींचे हे भांडार आहे. करवंद, कारवी, निरगुडी, अडुळसा, तोरण, शिकेकाई, रानमिरी, मुरूडशेंग, सर्पगंधा, वाघाटी, धायटी इ. झुडपे व वेली मोठ्या प्रमाणात आहेत.

सरिसृप गटात राधानगरी अभयारण्यात वेगवेगळ्या जातींच्या पाली, सरडे, साप-सुरळी आढळतात. उभयचर प्राण्यांमध्ये वेगवेगळ्या प्रजातींचे बेडूक आढळतात.

गांडुळासारखा दिसणारा देवगांडूळ यासारख्या पर्यावरणात महत्त्वाच्या परंतु दुर्लक्षीत अशा उभयचर प्राण्यांच्या जाती येथे आढळतात. एका नव्या पालीच्या प्रजातीचा शोध प्रथमच राधानगरी येथे बी. एन. एच. एस. चे वरिष्ठ संशोधक यांनी लावला. त्या पालीचे नामकरण सेनमॅससपीस कोल्हापुरेन्सीस करण्यात आले आहे. राधानगरी अभयारण्यात आजमितीस 33 प्रजातींच्या सापांची नोंद करण्यात आली आहे.

दाजीपुरचे जंगल रिसोर्ट महाराष्ट्र सरकारतर्फे चालविले जात असून काही मुलभूत गरजा भागविल्या जातात. दाजीपूर महाराष्ट्रातील सर्वोत्तम अशी छावणी साईट आहे.

कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर राधानगरी तालुक्यामध्ये कोल्हापूरपासून सुमारे 55 कि. मी. अंतरावर असलेल्या अभयारण्याचे क्षेत्रफळ सुमारे 351 चौ. कि. मी. आहे. त्याठिकाणी जवळचे विमानतळ कोल्हापूर बेळगाव येथून आहे. तसेच रेल्वे स्टेशन कणकवली, कोल्हापूर येथे आहे. कोल्हापूर राधानगरी दाजीपूर 80 कि. मी. निपाणी राधानगरी दाजीपूर 70 कि. मी. कणकवली दाजीपूर राधानगरी 60 कि. मी. आहे. बिसन राष्ट्रीय उद्यान, स्वामी गगनगिरी महाराज मठ, राधानगरी धरण, फोंडा घाट शिवगड किल्ला हे पाहण्यासाठी खास ठिकाणे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here