‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ची सर्वत्र चर्चानिर्मिती सावंत-प्रार्थना बेहरे झळकणार सासू-सुनेच्या दमदार भूमिकेत

0
15

प्रतिनिधी : प्रमोद पाटील

झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडिओज निर्मित बहुचर्चित मराठी चित्रपट ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, सध्या या चित्रपटाचा धमाल टीझर प्रचंड चर्चेत आहे. टीझर प्रदर्शित होताच चित्रपटाबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली असून, सासू–सुनेच्या नात्याचं हटके रूप प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने निर्मिती सावंत आणि प्रार्थना बेहरे पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार असून, त्यांची सासू–सुनेची जोडी प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. टीझरमध्ये दोघींची खट्याळ जुगलबंदी, मिश्किल टोमणे, धारदार संवाद आणि भावनिक क्षणांचा सुरेख समतोल पाहायला मिळतो. प्रार्थना बेहरे आधुनिक विचारांची, आत्मविश्वासू आणि स्पष्टवक्ती सून म्हणून तर निर्मिती सावंत पारंपरिक विचारांची, अनुभवसंपन्न आणि ठाम मतांची सासूबाई म्हणून यात बघायला मिळणार आहे.

दोन पिढ्या, दोन वेगवेगळ्या विचारधारा आणि दोन कणखर स्त्रियांमधील नात्याचं गोड-तिखट, हलकंफुलकं तरीही अर्थपूर्ण चित्रण हे या चित्रपटाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. समाजात नेहमी म्हटलं जातं, “प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते,” त्याप्रमाणे एका स्त्रीच्या मागे दुसरी स्त्री का नाही उभी राहू शकत? हाच विचार या चित्रपटात मांडण्यात आला आहे. यात नात्यातील अनेक गंमतीजंमतीही पाहायला मिळणार आहेत.

या चित्रपटाचं शीर्षकगीत नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, सासू–सुनेच्या नात्यातील टोमणे, नोकझोक, प्रेम आणि मस्तीचा खमंग स्वाद या गाण्यातून रंगतदारपणे मांडण्यात आला आहे. या टायटल ट्रॅकला वैशाली सामंत आणि प्रियांका बर्वे यांचा उत्साही आणि दमदार आवाज लाभला असून, त्यांच्या गायकीमुळे गाण्यातील खट्याळपणा अधिक जिवंत होतो. कुणाल–करण यांचं संगीत हे या गाण्याचं खास आकर्षण ठरतं. पारंपरिक ढंग आणि आधुनिक ठेका यांचा सुंदर मिलाफ साधत त्यांनी गाण्याला अशी चाल दिली आहे की, ती पहिल्याच ऐकण्यात लक्षात राहाते आणि नकळत गुणगुणायला भाग पाडते. वलय मुलगुंड यांच्या साध्या, बोलक्या आणि लक्षात राहाणाऱ्या शब्दांतून सासू–सुनेच्या नात्यातील आपुलकी आणि मिश्किलता सहजपणे उमटते.

दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतात, ”ही कथा आजच्या काळातील सासू-सुनेच्या नात्याची आहे. दोघीही स्वतंत्र विचारांच्या आणि स्वतःच्या मतांवर ठाम आहेत. त्यामुळे मतभेद, नोकझोक होते, परंतु त्याचवेळी समजूतदारपणा आणि भावनिक नात्याची सुंदर गुंफणही यात दिसते. सासू आणि सून एकमेकींसाठी आधार बनू शकतात, हीच या चित्रपटाची मध्यवर्ती भावना आहे.”

कधी हसवणारी, कधी मनाला भिडणारी आणि आजच्या काळातील सासू–सुनेच्या नात्याचे विविध पदर उलगडणारी ही कथा, दोन पिढ्यांमधील स्त्री–नात्याचं सामर्थ्य अधोरेखित करते.

झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे. उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर, सना शिंदे यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून, कथा व संवाद वैशाली नाईक आणि ओमकार मंगेश दत्त यांचे आहेत. पटकथा वैशाली नाईक यांची असून, छायाचित्रण आणि संकलन मयूर हरदास यांनी केले आहे. हा धमाल चित्रपट १६ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here