
कोल्हापूर | प्रतिनिधी : जानवी घोगळे
कोल्हापूरच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि खाद्यविश्वात नवे पर्व सुरू करणारे आर. एस. ग्रुप ‘दरबार’ रेस्टॉरंट ताराबाई पार्क येथे माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात आणि दिमाखात उद्घाटन झाले. केवळ एक रेस्टॉरंट न राहता, सेवाभाव, माणुसकी आणि दर्जेदार खाद्यसंस्कृती यांचा वारसा पुढे नेणारे हे ‘दरबार’ कोल्हापूरकरांसाठी एक वेगळीच ओळख ठरणार आहे.

‘दरबार’ – नावामागील सामाजिक वारसा
राज सरकार हे नाव कोल्हापूरमध्ये केवळ उद्योजक म्हणूनच नव्हे, तर सामाजिक कार्यकर्ते व सर्वसामान्यांचे आधारवड म्हणून ओळखले जात होते. बावडा येथील त्यांच्या निवासस्थानी दररोज ‘दरबार’ भरत असे. विविध अडचणी, समस्या घेऊन आलेल्या नागरिकांना ते आपुलकीने ऐकून घेत आणि कोणीही रिकाम्या हाताने परत जाऊ नये याची विशेष काळजी घेत. त्यांचा हाच सेवाभावी वारसा जपण्यासाठी आणि समाजाप्रती असलेली ही नाळ कायम ठेवण्यासाठी या रेस्टॉरंटला ‘दरबार’ असे अर्थपूर्ण नाव देण्यात आले आहे.
शुद्धता, स्वच्छता आणि चव – प्रमुख उद्देश
आजच्या धकाधकीच्या जीवनात नागरिकांना स्वच्छ, शुद्ध आणि आरोग्यदायी अन्न मिळावे, याच उद्देशाने ‘दरबार’ रेस्टॉरंटची उभारणी करण्यात आली आहे. दर्जेदार साहित्य, पारंपरिक पद्धती आणि कोल्हापुरी मसाल्याचा खरा स्वाद टिकवून ठेवत येथे पदार्थ तयार केले जाणार आहेत.

व्यवस्थापन – कुटुंबाचा विश्वास
या रेस्टॉरंटचे संपूर्ण व्यवस्थापन नुसरत शहानुर मुजावर सरकार आणि राजवीर मुजावर सरकार पाहत असून, हा त्यांचा हॉटेल व्यवसायातील पहिलाच प्रवास आहे. मात्र, प्रामाणिकपणा, गुणवत्तेवरचा विश्वास आणि ग्राहक समाधान या त्रिसूत्रीवर आधारित हा व्यवसाय निश्चितच यशस्वी ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
नुसरत शहानुर मुजावर सरकार या प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या आणि कायदे सल्लागार म्हणून ओळखल्या जातात. समाजसेवेचा मोठा अनुभव त्यांच्याकडे आहे. तर राजवीर मुजावर सरकार हे उद्योजक, अभिनेते तसेच रिअल इस्टेट क्षेत्रातील कार्यकर्ते म्हणून परिचित असून, त्यांच्या बहुआयामी अनुभवाचा सकारात्मक परिणाम ‘दरबार’ रेस्टॉरंटवर दिसून येणार आहे.
अस्सल कोल्हापुरी चवीचा मेजवानी अनुभव
‘दरबार’ रेस्टॉरंटमध्ये मांसाहारप्रेमींसाठी विशेष आकर्षण असणार आहे. येथे
बिर्याणी स्पेशल, मुंडी, पाया, भेजा फ्राय, नळी मटण स्पेशल, फिश फ्राय, फिश करी (अस्सल कोल्हापुरी), ग्रीन फ्राऊन्स
यांसारखे पारंपरिक आणि चवदार पदार्थ ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अस्सल कोल्हापुरी झणझणीत चव आणि घरगुती पद्धतीची शुद्धता हे या रेस्टॉरंटचे वैशिष्ट्य ठरणार आहे.

मान्यवरांची उपस्थिती
या उद्घाटन सोहळ्यास माजी आमदार ऋतुराज पाटील, पी. के. अण्णा पाटील, ॲड. विवेक घाटगे, ॲड. प्रकाश मोरे, SP-9 मराठी माध्यम समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर सागर पाटील, बाबा बुचडे, सुभाष बुचडे यांच्यासह अनेक मान्यवर, मित्रपरिवार व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी ‘दरबार’ रेस्टॉरंटच्या उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छांचा वर्षाव केला.
केवळ रेस्टॉरंट नव्हे, विश्वासाचे केंद्र
‘दरबार’ रेस्टॉरंट हे केवळ खाद्यगृह न राहता, सेवा, माणुसकी आणि संस्कार जपणारे एक विश्वासाचे केंद्र बनेल, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीला नवी उंची देणारे हे ‘दरबार’ रेस्टॉरंट लवकरच नागरिकांच्या पसंतीस उतरेल, यात शंका नाही.


