गुडाळ येथे गुणवंतांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न

0
20

क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव

प्रतिनिधी : जानवी घोगळे

गुडाळ येथे क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. ग्रामीण भागातून पुढे येत कठोर परिश्रम, शिस्त व चिकाटीच्या जोरावर यश मिळविणाऱ्या गुणवंतांचा सन्मान होताना पाहणे, हे उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरले.

या सोहळ्यात कु. सिद्धार्थ संग्राम पाटील याची राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल विशेष गौरव करण्यात आला. ग्रामीण परिसरातून राष्ट्रीय पातळीवर झेप घेणारा हा यशस्वी प्रवास संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

अशा गुणवंत सत्कार कार्यक्रमांमुळे समाजात कर्तृत्वाची जाणीव, आत्मविश्वास व सकारात्मक प्रेरणा निर्माण होते. विद्यार्थ्यांनी केवळ यशावर समाधान न मानता सातत्याने मेहनत करून आपले ध्येय गाठावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमास कोल्हापूरचे पालकमंत्री नाम. प्रकाश आबिटकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याशिवाय श्री. शिवाजीराव भिकू पाटील, श्री. बी. आर. पाटील, श्री. मानसिंग पाटील, श्री. संग्राम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन सुयोग्य पद्धतीने करण्यात आल्याबद्दल आयोजकांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले तसेच सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here