मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेने आपल्या दोन वर्षांच्या बाळाला सोबत घेऊन विहिरीत उडी घेतली.

0
96

गारगोटी : मुंबई येथे खोली घेण्यासाठी माहेराहून दोन लाख रुपये आणत नसल्याच्या कारणावरून पती, सासू, सासरे आणि नणंद यांनी दिलेल्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेने आपल्या दोन वर्षांच्या बाळाला सोबत घेऊन विहिरीत उडी घेतली.

यामध्ये त्या दोघांचा बुडून मृत्यू झाला. काजल अवधूत सलते (वय ३०, रा.भेंडवडे, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) आणि त्यांचा मुलगा प्रियांश (वय ०२) अशी त्यांची नावे आहेत.

आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयित आरोपी अवधूत बळवंत सलते, आई यशोदा, वडील बळवंत नाना सलते (सर्व रा. भेंडवडे, ता. भुदरगड) विवाहित बहीण शामल दत्तात्रय पाटील (रा. नाधवडे, ता. भुदरगड) यांच्या विरोधात मयतेचा भाऊ शामराव सुरेश पाटील (रा. मुगळी, ता. कागल) यांनी तक्रार भुदरगड पोलिसात दिली आहे.

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी अवधूत सलते आणि त्यांचे आई, वडील, बहीण हे संशयित काजल हिला मुंबई येथे खोली घेण्यासाठी माहेराहून एक ते दोन लाख रुपये घेऊन ये म्हणून मारहाण करीत होते.

२०१६ पासून सलग केलेल्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून काजल हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. तिला हा त्रास असह्य झाला होता. भेंडवडे येथे मंगळवारी (दि.२६) रात्री दत्त जयंतीनिमित्त गावात सोंगी भजन होते. सोंगी भजन पाहण्यासाठी अवधूत सलते यांच्या घरातील सर्व मंडळी गेली होती.

रात्री साडेदहाच्या सुमारास घरात कोणी नव्हते. काजल हिचा सात वर्षांचा मुलगा झोपला होता. त्यावेळी काजल हिने प्रियांशला सोबत घेऊन पांडुरंग धुमाळ यांच्या शेतातील विहिरीजवळ गेली. तेथे तिने आपल्या बाळाला पदराला बांधून विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक माने करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here