कोल्हापूर : पानिपतच्या रणसंग्रामाच्या स्मृती जागवणारा मराठा शौर्य दिवस १४ जानेवारीला हरियाणातील बसताडा येथे होत असल्याची माहिती अखिल भारतीय मराठा जागृती मंचचे कर्मवीर मराठा व ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. वसंतराव मोरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
पानिपत लढाईत वीरमरण आलेल्या योध्यांप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी गेली २१ वर्ष हा उपक्रम केला जातो.
ते म्हणाले, पानिपतच्या तिसऱ्या लढाईतून वाचलेल्या व हरियाणा येथे स्थायिक झालेल्या मराठा सैनिकांच्या वंशजांना २५० वर्षे रोड नावाने ओळखले जात होते.
मात्र समाजाचे नेते माजी सनदी अधिकारी वीरेंद्र मराठा यांच्या पुढाकाराने ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. वसंतराव मोरे यांनी १० वर्षे संशोधन करून त्यांना मराठा ही ओळख मिळवून दिली.
मराठा ही ओळख सिद्ध होण्यापूर्वीची स्थिती व त्यानंतर समाजात अनेक सामाजिक व राजकीयदृष्ट्या सकारात्मक परिणाम झाले आहेत, यासाठी समाज कायमच डॉ. मोरे यांचा ऋणी राहील.
याला देशभरातून १० ते १२ लाख कार्यकर्ते व कोल्हापूर जिल्ह्यातून १५० हून अधिक कार्यकर्ते जातात. यंदाही कोल्हापूरकरांनी या दिवशी उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी राष्ट्रीय महाले, दिलबर महाले, प्रविण घडतान उपस्थित होते.
पैश्याच्या आवाहनाला बळी पडू नका
महाले म्हणाले, आम्हाला फक्त महाराष्ट्रातील मराठा बांधवांचे प्रेम, आपलेपणा हवा आहे. पण पानिपत मोहिमेच्या नावाखाली काही बेकायदेशीर संस्था नागरिकांकडून पैसे गोळा करत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.
हरियाणातील मराठा समाज आर्थिकदृष्टया पुर्णत: संपन्न असून किमान १ लाखांवर तरुण परदेशांमध्ये नोकरी करत आहेत. हजारो मुले मोठ्या पदावर कार्यरत आहेत. देशभरातून कितीही कार्यकर्ते आले तरी त्यांनी सगळी सोय करण्याची ताकद मराठा जागृती मंचमध्ये आहे. त्यामुळे कोणिही कोणत्याही संस्थेला यासाठी पैसे देऊ नका.