कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहत येथील धार्मिक स्थळावर कार्यवाही करा, हिंदुत्ववादी संघटनांचा महापालिकेत ठिय्या

0
60

कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहतीमधील धार्मिक स्थळासंंबंधी तक्रार झाल्यानंतर बुधवारी महापालिका अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलिसांचे पथक कारवाईसाठी गेले. मात्र, तिथे धार्मिक कार्य सुरू नसल्याचे निदर्शनास आले.

त्यामुळे महापालिकेने कोणतीच कारवाई केली नाही. कारवाई का केली नाही अशी विचारणा करत हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी दिवसभर महापालिकेत ठिय्या मारला.

प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीनंतर शहर उपअभियंत्यांनी नगररचना विभागास पत्र देऊन त्या धार्मिक स्थळासंबंधी आवश्यक कार्यवाही करण्याचे सूचित केले. महापालिकेतील बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी आक्रमकपणे भावना मांडल्याने तणाव निर्माण झाला. हा विषय संवेदनशील असल्याने दिवसभर पोलिसांचा फौजफाटा महापालिकेत तैनात राहिला.

लक्षतीर्थ वसाहतमधील धार्मिक स्थळ अनधिकृत आहे. त्यामुळे त्यावर कारवाई करण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष कुंदन पाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे केली.

त्यानुसार बुधवारी अतिक्रमण विभागाचे पथक आणि पोलिस तिथे पोहोचले; पण धार्मिकस्थळ न पाडताच आल्याने हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी महापालिकेत दाखल झाले.

त्यांनी धार्मिकस्थळ पाडा आणि पापाची तिकटीतील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे काम अर्धवट असतानाही उद्घाटनाचे काम करणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी लावून धरली.

संध्याकाळपर्यंत ते महापालिकेत बसून होते. प्रशासनाने त्यांना पापाची तिकटीतील पुतळ्यासंबंधी येत्या सात दिवसांत कायदेशीर बाबी तपासून योग्य ती कार्यवाही करू अशा आशयाचे पत्र दिले.

दोन्ही मागण्यांसंबंधी पत्र मिळाल्यानंतर पदाधिकारी निघून गेले. पोलिस प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, महापालिकेत झालेल्या बैठकीत नगररचना विभागाचे अधिकारी, हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

‘त्या’ मदरसाची केली पाहणी

फुलेवाडी : लक्षतीर्थ वसाहत येथील गुंजोटे कॉलनी येथे अनधिकृतपणे सुरू असलेले मदरसा प्रार्थना स्थळ काढून घेण्यासाठीची पाहणी महानगरपालिका नगररचना विभागाने बुधवारी केली.

कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महानगरपालिका नगररचना विभागाने लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या पोलिस बंदोबस्तासह जागामालक लियाकत हाजी गोलंदाज यांच्या पत्र्याच्या शेडची पाहणी केली.

खासगी जागेत मदरसा सुरू असल्याची तक्रार विश्व हिंदू परिषदेने केली होती. तक्रारीनंतर नगररचना विभाग प्रत्यक्ष कारवाई करण्यासाठी गुंजोटी कॉलनी येथे पोलिस फौजफाट्यासह दाखल झाला होता.

प्रत्यक्षात कुलूपबंद असणाऱ्या पत्र्याच्या शेडचा पंचनामा नगररचना विभागाने केल्यानंतर येथे मदरसा सुरू नसल्याचे आढळून आले. या ठिकाणी मदरसा सुरू नसल्याचे अलिफा अंजुमन मदरसा व सुन्नत जमात न्याय संस्था यांनी नगररचना विभागास लेखी लिहून दिले आहे. कारवाईत नगररचना विभागाचे सहायक संचालक सुनील भाईक, रमेश भास्कर यासह नगररचना विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here