शिरोली सांगली फाटा ते उचगाव रेल्वे ब्रीजपर्यंत पिलर उड्डाणपूल मंजूर होईपर्यंत रस्त्याचे काम बंद ठेवणार, 

0
159

शिरोली : सहापदरीकरणामध्ये शिरोली येथील सांगली फाटा ते उचगावदरम्यान सुमारे तीन किलोमीटरपर्यंतच्या पिलरचा उड्डाणपूल करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गोवा येथील हाॅटेल ताज येथे झालेल्या आढावा बैठकीत ग्रीन सिग्नल दिला आहे.

या उड्डाणपुलासाठी अंदाजे ६०० कोटींचा वाढीव निधी लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या सातारा ते कागल या १३३ किलोमीटर अंतरातील सहापदरीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. सहापदरीकरणाचे काम करत असताना शिरोली सांगली फाटा ते उचगाव रेल्वे ब्रीज या तीन किलोमीटर अंतरावर पावसाळ्यात महामार्गावर पाणी येऊन सन २०१९ ला आठ दिवस, तर २०२१ ला चार दिवस महामार्गावरील वाहतूक बंद पडली होती.

सध्या महामार्गाचे काम करत असताना या भागात ११ मोहऱ्या (छोटे बोगदे) पाणी जाण्यासाठी मंजूर केल्या होत्या. तसेच १० फुटाने महामार्गाची उंची वाढणार होती. यामुळे भविष्यात पाऊस पडला की पंचगंगा नदीवर बंधारा तयार होऊन पाण्याची फुगी वाढून नदी किनाऱ्यावरील गावांना पुराचा धोका होता. तसेच शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात होणार होते.

म्हणून शिरोली सांगली फाटा ते उचगाव रेल्वे ब्रीजपर्यंत पिलर उड्डाणपूल मंजूर होईपर्यंत रस्त्याचे काम बंद ठेवणार, असा इशारा देत पूरग्रस्त समितीने पंचगंगा नदी पुलाजवळ एकदिवसीय ठिय्या आंदोलन केले होते. याबाबत खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, धैर्यशील माने, राजूबाबा आवळे, ऋतुराज पाटील यांच्याकडे स्थानिक लोक, शेतकरी यांची सतत मागणी होती.

महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या तीन राज्यांतील सुरू असलेल्या रस्ते कामांबाबत केंद्रीय मंत्री गडकरी आणि रस्ते अधिकारी, ठेकेदार यांची २३ डिसेंबर २०२३ रोजी गोवा येथील ताज हॉटेलमध्ये संयुक्त बैठक पार पडली़ बैठकीत शिरोली सांगली फाटा ते उचगाव रेल्वे ब्रीज या तीन किलोमीटर अंतरावरील पिलर उड्डाणपुलाबाबत सखोल चर्चा झाली. यावेळी मंत्री गडकरी यांनी लोकांना त्रास होऊ नये आणि मागणी असेल तर पिलरचा उड्डाणपूल करा आणि याबाबत अभ्यास करून वाढीव प्रस्ताव सादर करा, असे सांगून पिलरच्या उड्डाणपुलाला ग्रीन सिग्नल दिला आहे.

शंभर पिलरवर उड्डाणपूल

शिरोली सांगली फाटा ते उचगाव रेल्वे ब्रीज ३ किलोमीटरचा उड्डाणपूल सुमारे १०० पिलरवर उभारला जाणार आहे.

शिरोली सांगली फाटा ते उचगाव रेल्वे ब्रीजपर्यंत पिलरचा उड्डाणपूल उभारण्यासाठी गोवा येथील बैठकीत मंत्री नितीन गडकरी यांनी ग्रीन सिग्नल दिला असून, त्या पद्धतीने आम्ही संपूर्ण माहिती गोळा करून देत आहोत. –वसंत पंदरकर, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प अधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here