कोल्हापूर : लोकसभेचे रणांगण: महाविकास आघाडीचा ताळमेळ बसेना, जागा कुणाला हेच अद्याप ठरेना

0
91

कोल्हापूर : महायुतीत विद्यमान खासदारांनाच उमेदवारी मिळणार का, हा एकच संभ्रम असला तरी त्यांच्या विरोधातील महाविकास आघाडीत मात्र सगळाच गोंधळात गोंधळ आहे. अजून ही जागा नक्की कोणाच्या पक्षाच्या वाट्याला जाणार आणि मग त्या पक्षाचा उमेदवार कोण हे ठरणार, अशी स्थिती आहे.

निवडणूक काही दिवसांवर आली असताना हे चित्र आहे. तीन पक्ष आणि बारा नेते, त्यात कुणाचा कुणाला ताळमेळ नाही, असा सगळा कारभार आता तरी दिसत आहे.

गेल्या निवडणुकीत या दोन्ही जागा शिवसेनेने दणदणीत मतांनी जिंकल्या आहेत. आता हे दोन्ही खासदार शिवसेना ठाकरे गटाकडे नसले तरी ज्या पक्षाने जी जागा जिंकली होती, त्यांनाच ती जागा सोडायचा निर्णय झाल्यास या दोन्ही जागा ठाकरे शिवसेनेला जाऊ शकतात. त्यामुळे या जागांवर जास्त हक्क ठाकरे शिवसेनेचाच आहे. कोल्हापूर लोकसभेसाठी त्यांच्याकडे या घडीला मूळचे शिवसैनिक असलेल्या विजय देवणे यांनीच उमेदवारी मागितली आहे. अन्य कुणाचेही नाव पक्षातून पुढे आलेले नाही.

माजी आमदार संजय घाटगे यांनी अजून पत्ते खोलले नसले तरी ते देखील ठाकरे गटाचे प्रबळ उमेदवार ठरू शकतात. त्यांना माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांनी आपल्यावर सावली धरावी असे वाटते.

त्यामुळे ते थांबले आहेत. दोन दिवसांपूर्वी चेतन नरके यांनी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनाही ठाकरे यांनी काम सुरू करा, असा आदेश दिला असल्याचा दावा नरके यांच्याकडूनच केला जात आहे. त्यानुसार नरके यांनी साऱ्या शहरभर पुन्हा डिजिटल लावून वातावरण तापवायला सुरुवात केली आहे.

काँग्रेसचे या मतदारसंघात तीन विधानसभेचे आणि दोन विधानपरिषदेचे आमदार आहेत. जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी प्रत्येक तालुक्यात पक्षाची उत्तम बांधणी केली आहे. गोकुळसारख्या महत्वाच्या आर्थिक संस्थेवर पक्षाचे वर्चस्व आहे.

मूळ गावोगावी पक्षाची संघटनात्मक ताकद आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या जागेवर या पक्षाने दावा केला आहे. परंतु त्या जागेवर लढायचे कुणी? या प्रश्नाचे उत्तर काँग्रेसकडे नाही.

जिल्हाध्यक्ष पाटील व आमदार पी. एन. पाटील हे या जागेसाठी खमके उमेदवार आहेत. त्यांच्यासारखे उमेदवार रिंगणात उतरले तर ही जागा निघू शकते परंतु त्यांना इतक्यात देशाच्या राजकारणात जायचे नाही. काँग्रेसकडून बाजीराव खाडे गावोगावी फिरत आहेत परंतु मूळ पक्षातूनच त्यांच्या उमेदवारीस फारसे पाठबळ दिसत नाही.

राष्ट्रवादीतील फुटीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील ताकद विभागली. त्यात दोन्ही आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेल्याने शरद पवार गटाच्या ताकदीवर मर्यादा आल्या. या गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी शरद पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना एकत्र करून पक्ष जिवंत ठेवला आहे. शरद पवार राष्ट्रवादीकडून व्ही. बी. पाटील यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. परंतु राजकीय स्थिती कशी निर्माण होते यावर त्यांचा निर्णय अवलंबून असेल.

जागा शिवसेनेलाच शक्य..

कोल्हापूरची जागा शिवसेनेलाच मिळण्याची शक्यता जास्त आहे. विद्यमान खासदारांनी पक्षाशी गद्दारी केल्याचा व ५० खोक्याचा मुद्दा प्रचारात आणला जाऊ शकतो. याच मुद्यावर ठाकरे गट ही निवडणूक भावनिक करण्याची शक्यता आहे.

संजय घाटगे यांना बळ

कागल तालुक्यातील तिन्ही गट सध्या भाजपसोबत आहेत. त्यामुळे संजय घाटगे यांनाच उमेदवारी देऊन तिथे मतांचे एकतर्फी ध्रुवीकरण होणार नाही, असाही प्रयत्न महाविकास आघाडीकडून सुरू आहे. शिवसेनेचा उमेदवार व काँग्रेसचे चिन्ह असाही प्रयत्न केला जाऊ शकतो. ठाकरे शिवसेना फारच आग्रही राहिली तर काँग्रेसही घाटगे यांच्यामागे बळ उभे करू शकते. सध्यातरी सतेज पाटील व पी. एन. पाटील या दोघांचेही घाटगे या नावांवर एकमत झाल्याचे दिसत आहे.

हातकणंगलेत स्थिती आणखी बिकट..

हातकणंगले मतदार संघातून आजच्या घडीला तिन्ही पक्षांकडे ताकदीचा उमेदवार नाही. ही जागा आपण लढावयाची आहे, असा विचार हे तिन्ही पक्ष करत आहेत असे दिसत नाही. अधूनमधून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांचे नाव चर्चेत येते. परंतु चर्चेच्यापुढे त्यात काय घडामोड झालेली नाही. लोकसभेसाठी ते काय तयारी करत आहेत, असेही दिसत नाही. काँग्रेसकडे उमेदवार नाही. शिवसेनेकडे मुरलीधर जाधव हेच इच्छुक आहेत परंतु त्यांच्या उमेदवारीस मर्यादा आहेत.

राजू शेट्टी यांचे एकला चलो रे..

माजी खासदार राजू शेट्टी यांनी यंदाचे ऊस आंदोलन यशस्वी करून दाखवून लोकसभेसाठी शड्डू ठोकला आहे. भाजपचा सोगा त्यांनी अगोदरच सोडला आहे. परंतु महाविकास आघाडीचीही संगत नको, अशी त्यांची भूमिका आहे. चळवळीचे बळच आपले भवितव्य ठरवू दे, असा विचार करून त्यांनी हा मार्ग पत्करला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here