साधारण वीस वर्षांपूर्वी पोट भरण्यासाठी आई- वडिलांसह दगड फोडण्याचे व फरशी पॉलिश करण्याच्या मशीनवर तुटपुंज्या पगारावर काम करणारा राजेंद्र भीमराव नेर्लेकर हा आज कित्येक कोटींचा मालक झाला आहे.
महागड्या आलिशान गाड्यांतून व सुरक्षारक्षकांच्या गराड्यात फिरताना पाहून शहरवासीयांना तोंडात बोटे घालावी लागत आहेत. त्याच्या या भामटेगिरी व फसवाफसवीचे पितळ आता उघडे पडले आहे. आंध्र पोलिसांनी त्याला अटक केल्याने त्याच्या कारनाम्याची चर्चा सुरू झाली आहे.
चरितार्थ चालविण्यासाठी त्याने सुरुवातीस चांदी दागिने तयार करण्याचे काम सुरू केले. या व्यवसायातून खऱ्या अर्थाने त्याच्या फसवाफसवीच्या उद्योगास सुरुवात झाली.
चांदी व्यवसाय सुरू करण्यास ज्या महंमद मोमीन या मित्राने व कोल्हापुरातील शेठजीने मदत केली त्यांनाच त्याने टांग लावली. त्यानंतर सन २०१४-१५ मध्ये त्याने आरबीएन कंपनीच्या माध्यमातून शेळी- मेंढी पालन व विविध प्रकारच्या उद्योगांसाठी लोकांना उद्युक्त करण्यास सुरुवात केली.
यासाठी हुपरीतीलच घोरपडे कॉम्प्लेक्समध्ये आलिशान ऑफिस सुरू केले. या माध्यमातून परिसर व राज्याबाहेरील शेकडो जणांना केवळ दोन वर्षांच्या कालावधीत कोट्यवधी रुपयांचा चुना लावून हा उद्योग बंद केला. त्यानंतर सन २०१७ मध्ये त्याने बिटकॉइन करन्सीच्या धर्तीवर स्वत:ची झिप करन्सी नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीची महाराष्ट्र, गोवा व गुजरातमध्ये विविध ठिकाणी आलिशान ऑफिस उघडून मधाळ बोलण्याने शेकडो जणांना फसविले.
त्याच्याविरोधात अनेक राज्यातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्याचे संपूर्ण कुटुंब जेलची हवा खाऊन परतले आहे. फसवणूक झालेल्या अनेकांनी त्याची अनेकदा धुलाईही केली आहे. काहींनी पोलिसांच्या माध्यमातून जुजबी रक्कम पदरात पाडून घेऊन तडजोडही केली आहे. या ठकसेन राजूच्या मधाळ व लाघवी बोलण्याने फसून निमित्तसागर महाराजांनीही श्रावकांना सांगून या राजूला मोठी रक्कम दिली.
आता डॉल्फिनची करामत..
या सर्व प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी सध्या त्याने डॉल्फिन नावाने शेअर मार्केटिंगची नवीन फर्म पुण्यात सुरू केली आहे. या फर्मच्या मोहजालात सुमारे पावणे दोनशे शिक्षक कोट्यवधी रुपयांसह अडकले आहेत. त्याच्या या सर्व फसवणुकीच्या उद्योगाची कुंडली स्थानिक गुन्हे अन्वेषणने खणून काढली असून सध्या हे प्रकरण आर्थिक गुन्हे अन्वेषणकडे पुढील तपासासाठी पाठविण्यात आल्याचे समजते.