कोल्हापूर : सायकल चालविल्यामुळे प्रदूषण होत नाही, शरीराचा चांगला व्यायाम होतो, शरीर आणि मन निरोगी, उत्साही, आनंदी राहते, असा संदेश देत बर्फ, उभ्या चढ-उताराचा रस्ता पार करत ७१ वर्षांचे तरुण तुर्क आणि ४७ वर्षाचे वृद्धत्वाकडे झुकलेल्या कोल्हापूरच्या सात जणांनी नुकतीच काश्मीर ते कोल्हापूर सायकल सफर लीलया पूर्ण केली.
धैर्यशील पाटील (वय ५३, रा. कसबा बावडा), महिपती संकपाळ (वय ६५, रा. जरगनगर), आकाश रांगोळे (वय ४७, रा. जरगनगर), रामनाथ चोडणकर ( वय ५७ रा. जवाहरनगर), वसंत घाडगे (वय ६७, राजारामपुरी), निशिकांत साळवेकर (वय ५९, मंगळवार पेठ), अविनाश बोकील (वय ७१, रा. आरके नगर), महादेव पाटील (वय ५०, रा. कळंबा) हे सात सायकलवीर काश्मीरमधून १८ दिवसात २४०० किलोमीटर इतके अंतर सहजपणे पार करत कोल्हापुरात परतले.
यापैकी धैर्यशील पाटील, रामनाथ चोडणकर, आकाश रांगोळे, महादेव पाटील पुढे कन्याकुमारीपर्यंत सायकलीवरून जाऊन तिथे तिरंगा फडकवला. २१ नोव्हेंबरला हे सर्व जण विमानाने श्रीनगरमध्ये पाेहोचले.
आधीच पाठविलेल्या सायकली जोडल्यानंतर २३ तारखेला त्यांनी श्रीनगरमध्ये लाल चौकात तिरंगा फडकावून सायकल प्रवास सुरू केला. जम्मू काश्मिर, राजस्थान, गुजरातमार्गे ते महाराष्ट्रात परतले.
प्रतिकूल हवामानामध्येही ते रोज दीडशे किलोमीटर सायकल चालवायचे. सायकलचा वापर सर्वांनी केल्यास वाहतूक कोंडी, पार्किंग यासारख्या समस्या सुटतील. सार्वजनिक, शारीरिक आणि मानसिक आरोग्य, पर्यावरण, रस्ता रुंदीकरण यावर केवळ सायकलिंग हाच पर्याय आहे, अशाही प्रतिक्रिया या सात जणांनी दिल्या.
२०१४ पासून सायकलिंग
कोल्हापुरातील या ग्रुपने २०१४ पासूनच चंदीगड ते लेह असा सायकल प्रवास करून सायकलिंगला सुरुवात केली. दरवर्षी एका ठिकाणी त्यांचा प्रवास होतो. यामध्ये लेहला तीन वेळा सायकल प्रवास त्यांनी केला आहे. पत्नीसोबतही २०१७ मध्ये सिमला ते स्पीतीव्हॅली असा सायकल प्रवास या ग्रुपने केला आहे.