प्रतिनिधी : अभिनंदन पुरीबुवा.
कोल्हापूर :दर वर्षी विशेष पोलीस महानिरीक्षक सर्व पोलीस ठाण्यांच्या वार्षिक कारभाराची तपासणी करत असतात. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांची विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी तपासणी केली आहे.
त्यामध्ये करवीर आणि गडहिंग्लज पोलीस ठाणे अनुत्तीर्ण असल्याचा अहवाल समोर आला आहे. त्यामुळे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी करवीर पोलीस ठाण्यातील निरीक्षक अरविंद काळे, उपनिरीक्षक जालिंदर जाधव आणि गडहिंग्लज पोलीस ठाण्यातील निरीक्षक गजानन सरगर यांना राखीव पोलीस निरीक्षकांकडे प्रशिक्षणासाठी पाठवण्याचा आदेश दिला.
करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २१९ नागरिक बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या स्वतंत्र नोंदी किंवा नोंदवही ही उपलब्ध नाही. सीसीटीएनएस प्रणालीतून प्रती काढून त्याचे गठ्ठे बांधून ठेवले आहेत. मुद्देमाल निर्गतीची कामे प्रलंबित आहेत. काही मुद्देमाल ३५ ते ४० वर्षापासून पडून आहेत. मुद्देमालही वर्षनिहाय मांडणी केलेली नाही. काही गुन्हांच्या तपासात संशयित आरोपींना मदत होईल असे वर्तन केले असल्याचे अहवालात नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी कारवाईचा धडाका लावला आहे.