२९ डिसेंबर रोजी सायंकाळी शेगांव तालुक्यातील भोनगांव येथील ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रेतीची वाहतूक करणाऱ्या विना नंबरच्या टिप्पर वाहनानं दुचाकीला जोरदार धडक दिली.
यामध्ये गौरी राजेश शेळके या तरूणीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर टिप्पर चालक फरार झाला होता. फरार टिप्पर चालकाला ३० डिसेंबर रोजी अटक करण्यात आली असून, विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२९ डिसेंबर रोजी अपघात घडल्यानंतर भोनगाव, शेगाव येथील नातेवाईक तसेच ग्रामस्थांनी शेगाव ग्रामीण पो. स्टेशनमध्ये धाव घेऊन रेती वाहतूक करणारे वाहन व चालकास त्वरित अटक करण्याची मागणी केली होती.
यावेळी पोलिस स्टेशनमध्ये तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी एम.एच. २८ बीबी २४४० या क्रमांकाच्या टिप्परचा चालक विक्की संजय गोरले (वय २३) याच्या विरोधात २७९, ३०४ अ कलमान्वये गुन्हा नोंद करुन त्याला अटक केली आहे. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सईबाई मोटे सामान्य रुग्णालय शेगाव येथे आणला असता माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी रुग्णालयात जावून शेळके कुटुंबीयांची भेट घेतली.
यावेळी दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, काही भ्रष्ट महसूल व पोलीस अधिकाऱ्याच्या आशीवार्दाने शेगाव तालुक्यामध्ये मोठया प्रमाणात विना नंबर प्लेट असलेल्या गाडयांद्वारे रेतीची अवैध तस्करी सुरु आहे.
यामुळे दररोज अपघाताच्या घटना घडून अनेकांचे बळी जात आहे. जनतेने जागरुक राहून अवैध रेती तस्करीविरुद्ध आवाज उठवावा असे सानंदा यांनी सांगितले. यावेळी शेगाव तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय काटोले, खामगाव तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज वानखडे, खामगाव कृ.उ.बा.स.चे सभापती सुभाष पेसोडे यांच्यासह भोनगांव येथील ग्रामस्थ उपस्थित होते.