कदमवाडी : कसबा बावड्यातील कचरा कोंडाळ्यात टाकलेले स्त्री अर्भक अनैतिक संबंधातून जन्माला आले आहे का, याचा शोध शाहुपूरी पोलिस घेत आहेत. या अर्भकाची ओळख पटू शकेल असे दोन-तीन दुवे पोलिसांच्या हाती लागले असल्याची माहिती आहे.
या अर्भकाची प्रकृती स्थिर असून त्याचे वजन कमी असल्याने अजून किमान आठवडाभर त्याला दवाखान्यात ठेवण्याची गरज असल्याचे ‘सीपीआर’च्या वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
सर्वसाधारण जन्मलेल्या सुदृढ बाळाचे वजन हे अडीच किलोंपेक्षा जास्त असते; पण या अर्भकाचे वजन दीड किलो असून त्याच्या तोंडाला खरचटल्याची जखम आहे. सध्या रुग्णालयात त्याच्यावर औषधोपचार सुरू असून, सध्या सीपीआर रुग्णालयातील डाॅक्टर आणि कर्मचारी त्याची मायेने काळजी घेत आहेत.
शाहुपुरी पोलिसांकडून परिसरातील खासगी दवाखान्याकडून माहिती घेण्यात येत असून परप्रांतीय; तसेच मोलमजुरी करणारी भाडेकरू महिला कोणी गरोदर होती का, याची चौकशी करण्यात येत आहे.
सीसीटीव्हीच्या चित्रणाचा शोध घेतला जात आहे; परंतु ते अजूनतरी मिळालेले नाही. येत्या एक-दोन दिवसांत पोलिस त्या निर्दयी आई-वडिलांपर्यंत पोचण्याची शक्यता आहे.
घरीच प्रसूती..
या बाळाची नाळ तशीच होती. दवाखान्यात प्रसूती झाल्यास त्या नाळेला दोरा किंवा चिमटा लावला जातो; मात्र असे काहीही या बाळाच्या नाळेला लावण्यात आले नव्हते. ‘सीपीआर’च्या डाॅक्टरांच्या मते ही प्रसूती एक ते दीड दिवसापूर्वी एखाद्या आयाकडून घरी करण्यात आली असल्याचा अंदाज आहे.