कोल्हापूर : ‘पैसे काय मागतोस, मी कोण आहे तुला माहिती नाही काय?’ असे धमकावत चार वर्ष फुकट बिर्याणी खाणाऱ्या गुंडाला शाहूपुरी पोलिसांनी शनिवारी (दि. ६) रात्री ताराराणी चौक परिसरातून अटक केली.
आकाश आनंद भोसले (वय ३०, रा. माकडवाला वसाहत, ताराराणी चौक, कोल्हापूर) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे. फेरीवाले आणि व्यावसायिकांना त्रास देणाऱ्या गुंडांचा बंदोबस्त करण्याची मोहीम या कारवाईने सुरू झाली.
माकडवाला वसाहतीत राहणारा आकाश भोसले हा गेल्या चार वर्षांपासून मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना दमदाटी करून त्यांच्याकडून फुकट खाद्यपदार्थ उकळत होता.
याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास व्यवसाय करू देणार नाही, असेही तो धमकावत होता. शाहूपुरी पोलिसांनी शनिवारी फेरीवाले आणि व्यावसायिकांची बैठक घेऊन गुंडांच्या विरोधात तक्रारी देण्याचे आवाहन केले.
त्यानुसार काही व्यावसायिकांनी आकाश भोसले या गुंडाबद्दल तक्रार दिली. पोलिसांनी शनिवारी रात्री या गुंडाला माकडवाला वसाहतीमधून ताब्यात घेतले.
पोलिसी खाक्या दाखवताच त्याने बिर्याणी सेंटरवरून अनेकदा फुकट बिर्याणी आणि मासे घेतल्याची कबुली दिली. पोलिसांनी अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. पोलिस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांच्या सूचनेनुसार सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ, सहायक फौजदार संदीप जाधव, मिलिंद बांगर, बाबा ढाकणे, लखन पाटील, महेश पाटील, आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
अन्य गुंडांचा शोध सुरू
आकाशचे सातवीपर्यंत शिक्षण झाले असून, शहरात टोपी, गॉगल विक्रीचा ढकल गाडा चालवत असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. या गुन्ह्यात त्याच्या काही साथीदारांचाही समावेश असू शकतो. त्या अनुषंगाने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
व्यावसायिकांमध्ये गुंडांची दहशत
पोलिसांनी बैठक घेऊन फेरीवाले आणि व्यावसायिकांना गुंडांच्या विरोधात तक्रारी देण्याचे आवाहन केले आहे. तक्रारदारांचे नाव गोपनीय ठेवण्याचे आश्वासन देऊनही व्यावसायिक तक्रारी देण्यास निरूत्साही होते. पहिल्या दिवशी केवळ एका गुंडाचे नाव त्यांच्याकडून मिळाले. यावरून व्यावसायिकांमध्ये गुंडांची दहशत असल्याचे स्पष्ट होते.
तीन पोलिस ठाण्यांनी घेतल्या बैठका
पोलिसांच्या मासिक गुन्हे आढावा बैठकीनंतर गुंडांवर कारवायांची धडक मोहीम सुरू करणार असल्याचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले. तत्पूर्वीच पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली असून, शहरातील शाहूपुरी, लक्ष्मीपुरी आणि राजारामपुरी पोलिसांनी त्यांच्या परिसरातील फेरीवाले, विक्रेत्यांच्या बैठका घेऊन गुंडांची माहिती काढणे सुरू केले. शाहूपुरी पोलिसांनी पहिली कारवाई केली असून, काही सराईत गुंड रडारवर असल्याचे निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांनी सांगितले.
या परिसरात गुंडांचा वावर
मध्यवर्ती बसस्थानकासह राजारामपुरी, सायबर चौक, हॉकी स्टेडियम चौक, रंकाळा या परिसरात स्थानिक गुंडांची दहशत आहे. कनाननगर, सदर बाजार, ताराराणी चौक, राजेंद्रनगर, लक्षतीर्थ वसाहत येथील गुंड त्यांच्या साथीदारांकडून दहशत आणि खंडणीचे रॅकेट चालवतात. यात काही व्हाईट कॉलर गुंडांचाही समावेश आहे.
दहा वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद
कलम ३८४, ३८६, ५०४ आणि ५०६ नुसार गुंड भोसले याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. धमकावणे, बळजबरी करणे, जबरदस्तीने वस्तू काढून घेणे, जिवे मारण्याची धमकी देणे हे गुन्हे न्यायालयात सिद्ध झाल्यास त्याला दहा वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.