कोल्हापूर : आरके नगर येथील अष्टविनायक पार्क आणि सहा नंबर सोसायटीमध्ये दोन अभियंत्यांच्या बंद बंगल्यांचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील रोकडसह लाखोंचा ऐवज लंपास केला. चोरीच्या दोन्ही घटना शुक्रवारी (दि.
११) ते बुधवारच्या (दि. १६) दरम्यान घडल्या. करवीर पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, घरमालक जयदीप गंगाधर थोरात (वय ३४, रा. आरके नगर) हे शुक्रवारी पत्नीसह बाहेरगावी गेले होते. बुधवारी सायंकाळी परत आल्यानंतर त्यांना घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेल्या स्थितीत दिसला. चोरीचा प्रकार लक्षात येताच त्यांनी करवीर पोलिसांना माहिती दिली. चोरट्यांनी साडेनऊ हजार रुपयांची रोकड, दीड तोळ्यांचे मंगळसूत्र, अर्धा तोळ्याची चेन, नऊ ग्रॅमच्या लहान अंगठ्या, चांदीचे पैंजण, जोडवी असा सुमारे एक लाख एक हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा उल्लेख थोरात यांनी फिर्यादीत केला आहे.
सहा नंबर सोसायटीमधील संजय श्रीपाद परुळेकर (वय ७१) यांच्या बंगल्यात मंगळवारी (दि. १५) पहाटे चोरट्यांनी चोरी केली. वरच्या मजल्यावर राहणा-या भाडेकरूंच्या दरवाजाची बाहेरची कडी लावून चोरट्यांनी परुळेकर यांच्या घरात डल्ला मारला. दरवाजा उघडत नसल्याने भाडेकरूंनी परुळेकर यांना फोन केला. त्यानंतर परुळेकर यांचे भाऊ दरवाजा उघडण्यासाठी पोहोचताच चोरीचा प्रकार निदर्शनास आला. चोरट्यांनी बेडरूममधील कपाटातील दागिने लंपास केले.
चोरीच्या घटनेची माहिती मिळताच करवीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकासही पाचारण केले होते. उपअधीक्षक संकेत गोसावी यांनी पाहणी करून तपासाबद्दल सूचना दिल्या. गुरुवारी रात्रीपर्यंत फिर्याद दाखल झाली नसल्याने चोरट्याने नेमका किती लाखांचा ऐवज लंपास केला, हे स्पष्ट होऊ शकले नाही. पोलिस उपनिरीक्षक निवास पवार तपास करीत आहेत.