फासकी लावून बिबट्याची हत्या; साळिस्ते येथील एकाला अटक, वनविभागाची कारवाई

0
130

कणकवली तालुक्यातील साळीस्ते येथे वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी लावलेल्या फासकीत बिबट्या अडकून मृत झाला आहे. या संरक्षित वन्यप्राणी असलेल्या बिबट्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी फासकी लावणाऱ्या साळिस्ते येथील अनिल आत्माराम कणेरे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई सावंतवाडीचे उपवनसंरक्षक नवाकिशोर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली वनपरीक्षेत्र अधिकारी राजेंद्र घुणकीकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. ८ जानेवारी रोजी पहाटे हा गुन्हा घडला होता.

साळिस्ते येथे फासकीमध्ये बिबट्या अडकल्याची माहिती तळेरे येथील सामाजिक वनीकरणच्या वनपालांनी फोंडा येथील वनपालाना दुरध्वनीवरुन दिली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह पथक तत्काळ घटनास्थळी साळिस्ते येथे दाखल झाले. तिथे फासकीत अडकलेल्या बिबट्याची त्यांनी माहिती घेतली. तसेच बिबट्याचे शव ताब्यात घेतले.

साळिस्ते येथील विलास वरे यांच्या मालकीच्या आंबा बागेच्या संरक्षणाचे काम अनिल आत्माराम कणेरे (५५, रा. साळिस्ते)हे करतात. त्यांनी आंबा बागेच्या कुंपणास फासकी लावली होती. त्या फासकीत पहाटेच्या वेळी अंदाजे १० वर्ष वयाचा बिबट्या अडकला.तसेच तो मृत झाल्याचे निदर्शनास आले.

याबाबतची माहिती वनविभागास दिल्यावर सावंतवाडी येथील उपवनसंरक्षक व सहाय्यक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मृत बिबट्यास ताब्यात घेवून खारेपाटण येथील पशुधन विकास अधिकारी रविंद्र दळवी व जानवली पशुधन विकास अधिकारी स्वप्नील अंबी यांच्याकडून शवविच्छेदन करुन त्याचे कणकवली वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या आवारात दहन करण्यात आले.

त्याचप्रमाणे अनिल आत्माराम कणेरे यांनी आंबा बागेत असणा-या कुंपणाला वन्यप्राण्याची शिकार करण्याच्या उद्देशाने लावलेल्या फासकीत बिबट्या अडकून मृत पावल्याने त्यांच्यावर वन्यजीव (संरक्षण) अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कणेरे यांनी गुन्हा कबुल केला आहे. अशी माहिती कणकवली वनपरीक्षेत्र अधिकारी राजेंद्र घुणकीकर यांनी दिली.

सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनिल लाड, कणकवली वनपरीक्षेत्र अधिकारी राजेंद्र घुणकीकर, फोंडा वनपरिमंडळ अधिकारी धुळू कोळेकर, देवगड वनपाल सारीक फकीर, दिगवळे वनपाल सर्जेराव पाटील, मालवण वनपाल श्रीकृष्ण परिट व वनरक्षक अतुल पाटील, रामदास घुगे, सुखदेव गळवे, सिध्दार्थ शिंदे, प्रतिराज शिंदे, अतुल खोत व वनसेवक दिपक बागवे, चंद्रकांत लाड व साळिस्ते पोलिस पाटील गोपाळ चव्हाण व ग्रामस्थ मोहन भोगले तसेच इतर ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here