ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘वयोश्री योजना’ राबविणार, दरमहा ३००० रुपये मिळणार; खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली माहिती

0
82

इचलकरंजी : राज्यातील ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘वयोश्री योजना’ राबविण्यात येणार असून, प्रत्येकाच्या खात्यात तीन हजार रुपये जमा केले जातील. या योजनेची घोषणा लवकरच राज्य सरकार करणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली.

येथील संजय गांधी निराधार योजनेतील ४०० लाभार्थ्यांना शिंदे यांच्या हस्ते पत्र वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. शिंदे म्हणाले, संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांना १५०० रुपयांऐवजी आता दोन हजार रुपये पेन्शन देण्याबाबत सरकार विचार करीत आहेत. दिव्यांगांना न्याय देण्यासाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करून त्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जात आहेत. तसेच संगांयोमधील २५ हजार रुपये उत्पन्नाची अट बदलून ५० हजार रुपयांपर्यंत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांच्या मुलाचे वय २५ वर्षे झाल्यानंतर त्या यादीतून लाभार्थ्याचे नाव वगळले जात होते; मात्र ही अट शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे आता ज्येष्ठांना आयुष्यभर पेन्शन स्वरूपात लाभ मिळणार आहे; तसेच आता राज्य सरकार ६५ वर्षांवरील व्यक्तींच्या खात्यात थेट तीन हजार रुपये आणि पेन्शनचे १५०० रुपये असे साडेचार हजार रुपये मिळतील.

खासदार धैर्यशील माने, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची भाषणे झाली. संजय गांधी योजनेचे अध्यक्ष अनिल डाळ्या यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विठ्ठल चोपडे, रवींद्र माने, अमृत भोसले यांच्यासह संजय गांधी योजनेचे पदाधिकारी व लाभार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here