अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी झटणाऱ्या शेकडो व्यक्तिंना दररोज भोजनदान आणि चहापाणी देण्याचा अनोखा उपक्रम चालविला जात आहे. ना त्याची कुठे प्रसिद्धी केली जाते ना त्याचे श्रेय घेतले जाते.
बाबा जय गुरूदेव यांच्या शिष्यवर्गाने आध्यात्मिक गुरू उमाकांतजी महाराज यांच्या प्रेरणेने हा उपक्रम अखंड सुरू ठेवला आहे. मंदिराची उभारणी सुरू झाली तेव्हाच उमाकांतजी महाराज यांनी असा संकल्प केला होता की, इथे राबणाऱ्या मजुरांसाठी तसेच कारसेवकपूरममध्ये मोठमोठ्या शिळांवर कोरीव काम करणाऱ्यांसाठी ते भोजनदान नियमितपणे करतील.
दोनवेळेला त्यांना चहापाणीही द्यायचे. एवढेच नव्हे तर प्रभू श्रीराम मंदिराच्या परिसरात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांना आणि अयोध्येतील भिक्षेकऱ्यांनाही भोजनदान देण्याचे ठरविले गेले आणि या सेवेत आजवर एकही दिवस खंड पडलेला नाही.
धान्य कधीच कमी नाही
- हे भोजनदान प्रभू रामाप्रति असलेल्या भक्तीचा एक भाग आहे. त्यासाठी धनधान्य येते कुठून हे अधिक अचंबित करणारे आहे.
- हजारो, लाखो रामभक्तांनी दिलेल्या चिमूटभर धान्यातून धान्याच्या राशीच्या राशी तयार होतात आणि धान्य कमी पडले, असे कधीही होत नाही.
- काही भक्त निधीदेखील देतात. त्यातून मग तेल, इंधन आदींची तजवीज केली जाते.
सेवेसाठी अट काय?
- या सर्व उपक्रमात सेवेकरी म्हणून ज्यांची सेवा घेतली जाते ते निर्व्यसनी असलेच पाहिजेत, ही मुख्य अट आहे. कारसेवकपूरममध्ये भोजनालय चालविले जाते.
- तेथूनच मंदिर आणि राम जन्मभूमी ट्रस्टच्या कार्यशाळेत काम करणाऱ्यांना भोजन, चहापाणी पोहोचविले जाते. ४५ जणांची टीम हे काम करते.
- जगदीश पटेल, पातीराम, आयुष अग्निहोत्री, शोभा राम, जग्गू राम आर्य हे त्यातीलच काही जण आहेत.