राज्याच्या राजकारणासाठी आजचा मोठा दिवस ठरणार आहे. काही तासांत गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या राजकीय खेळाचा निकाल येणार आहे. एकनाथ शिंदे गट की उद्धव ठाकरे गट अपात्र ठरतो त्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देणार आहेत.
अशातच शिंदे गट अपात्र ठरल्यास पुढे काय? असा सवाल अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे. याचदरम्यान माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दिवसेंदिवस लोकशाही चेपली जात आहे. सत्तेसोबत नाहीत त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. तसेच विधानसभा अध्यक्ष यांनी मुख्यमंत्री शिंदेंना भेटायला जाणं, म्हणजे गुन्हेगाराला भेटायला जाणं असा त्याचा अर्थ आहे. संविधानिक निकाल आला तर ४० आमदार अपात्र होतील, असा दावाही आदित्य ठाकरेंनी केला आहे.
दरम्यान, गेल्या ५ महिन्यांपासून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संबंधित प्रकरणातील दोन्ही बाजुंवरील सुनावणी घेतली. आता अखेर आज याबाबत निर्णय येणार आहे. याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रीया दिली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आज दिला जाईल. कायद्याला धरून हा निकाल असेल. कायद्याच्या सर्व तरतुदींचे पालन करून हा निकाल दिला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने जी मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत, त्याला अनुसरूनच हा निकाल असेल, असंही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
शिवसेना शिंदे गटातील कोणत्या १६ आमदारांचा समावेश?
– एकनाथ शिंदे
– भरत गोगावले
– संजय शिरसाठ
– लता सोनवणे
– प्रकाश सुर्वे
– बालाजी किणीकर
– बालाजी कल्याणकर
– अनिल बाबर
– चिमणराव पाटील
– अब्दुल सत्तार
– तानाजी सावंत
– यामिनी जाधव
– संदीपान भुमरे
– संजय रायमूळकर
– रमेश बोरनारे
– महेश शिंदे
उद्धव ठाकरेंच्या गटातील कोणत्या १४ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार?
– अजय चौधरी
– भास्कर जाधव
– रमेश कोरगावंकर
– प्रकाश फातर्फेकर
– कैलास पाटील
– संजय पोतनीस
– रवींद्र वायकर
– राजन साळवी
– वैभव नाईक
– नितीन देशमुख
– सुनिल राऊत
– सुनिल प्रभू
– उदयसिंह राजपूत
– राहुल पाटील