कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या प्रथम लोकपालपदी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश (निवृत्त) सुधीर पुरुषोत्तम कुलकर्णी यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) यांच्या ११ एप्रिल २०२३ रोजीच्या अधिसूचनेनुसार सर्व विद्यापीठांमध्ये विद्यार्थी तक्रार निवारण कक्ष व लोकपाल नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.
त्या अधिसूचनेतील तरतुदीनुसार कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी विद्यापीठाच्या विद्यार्थी तक्रार निवारण कक्षाच्या निकालाबाबत अपिलीय अधिकारी व लोकपाल म्हणून निवृत्त न्यायमूर्ती सुधीर कुलकर्णी यांची नियुक्ती केली. नांदेड येथून मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश पदावरून ते सप्टेंबर २०१८ मध्ये निवृत्त झाले आहेत.