अयोध्येतील राम मंदिरात रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. अवघे काही दिवस राहिले असल्याने लगबगीला वेग आला आहे. या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलेल्यांना आमंत्रणे पोहोचली आहेत.
यावरून विरोधक सातत्याने केंद्रावर टीका करताना दिसत आहेत. यातच आता काँग्रेस पक्ष राम मंदिर उद्घाटनाच्या सोहळ्यात सहभागी होणार नसल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसच्या या भूमिकेवर भाजपाने टीका केली असून, काँग्रेसचा प्रभू श्रीरामविरोधी चेहरा पुन्हा एकदा देशासमोर आला, या शब्दांत निशाणा साधण्यात आला आहे.
काँग्रेसने जाहीर केले की, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि अधीर रंजन चौधरी यांनी राम मंदिर अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रण ‘आदरपूर्वक नाकारत’ आहे. भाजप आणि आरएसएस निवडणूक फायद्यासाठी याचा वापर करत आहेत. हा एक राजकीय कार्यक्रम बनविण्यात आला आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. मीडियाशी बोलताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
काँग्रेसचा प्रभू श्रीरामविरोधी चेहरा पुन्हा एकदा देशासमोर आला
काँग्रेसचा प्रभू रामविरोधी चेहरा पुन्हा एकदा देशासमोर आला आहे. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेस पक्षाने न्यायालयात कागदपत्रे सादर करताना म्हटले होते की, प्रभू श्रीरामांचे काहीच अस्तित्व नाही, याची आठवण स्मृती इराणी यांनी करून दिली. अयोध्येतील राम मंदिरात होणारा रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा धर्म, आस्था या दृष्टिकोनातून भाविकांसाठी, रामभक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, असे स्मृती इराणी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते नलिन कोहली यांनी म्हटले आहे की, काँग्रेस अधिकृतपणे सांगत आहे की, त्यांचे वरिष्ठ नेते २२ जानेवारीला अयोध्येत नसतील, यात आश्चर्य वाटायला नको. कारण गेल्या काही दशकांत काँग्रेसने असे एकही पाऊल उचलले नाही की, ज्यावरून असे म्हणता येईल की, त्यांना अयोध्येत मंदिर बांधायचे आहे. यूपीए सरकारने प्रभू रामाचे अस्तित्व नाकारण्यासाठी सर्वोच्च न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. या प्रकरणाची लवकर सुनावणी व्हावी असे त्यांना कधीच वाटले नाही. आता तिथे मंदिर बांधले गेल्याने ते अयोध्येला जाणार नसल्याचे सांगत आहेत. तेथे मंदिर बांधावे असे त्यांना कधीच वाटले नाही, अशी टीका करण्यात आली.