‘क्रिकेटचा देव’ २२ तारखेला अयोध्येत! सचिन तेंडुलकरला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण

0
110

२२ जानेवारीला उत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराची पायाभरणी होणार आहे. या कार्यक्रमानिमित्त देशभरात उत्सवाचे वातावरण आहे. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींना या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी राम मंदिर ट्रस्टकडून आमंत्रण देण्यात आले आहे.

यावरून राजकारण देखील चांगलेच तापले असून सत्ताधारी भाजपा आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरला राम मंदिराच्या भव्य कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. या भव्य उद्घाटन सोहळ्याआधी १६ जानेवारीपासूनच विविध कार्यक्रम सुरु होतील. ४ हजार साधुसंतांसह ७ हजार लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.

रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या सदस्याने सांगितले की, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात ११,००० हून अधिक पाहुणे आणि निमंत्रितांना संस्मरणीय भेटवस्तू देण्याची व्यवस्था केली जात आहे.

दरम्यान, २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील भव्य मंदिरात रामलला विराजमान होणार आहेत. राम मंदिरात मूर्ती स्थापनेची वेळ १२.२९ मिनिटे ८ सेकंद ते १२.३० मिनिटे ३२ सेकंद अशी असेल. प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त फक्त ८४ सेकंदांचा असणार आहे.

पंतप्रधान मोदींचे आवाहन
२२ तारखेला विविध क्षेत्रातील नामांकित मंडळी अयोध्येला पोहचतील. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना २२ तारखेनंतर दर्शनाला येण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले की, आपापल्या क्षेत्रातील लोकांना २२ जानेवारीनंतरच रामललाच्या दर्शनाला घेऊन जा. २२ जानेवारी रोजी राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्यामध्ये देशातील निवडक लोकांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर लोक अयोध्येत येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here