: सराफा दुकानातील पाच किलो सोने आणि अकरा लाखांची रोकड चोरणाऱ्या मुख्य आरोपीसह त्याच्या साथीदारांना फरासखाना पोलिस आणि गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने अटक केली. त्यांनी चोरलेला मुद्देमाल पाण्याचा पाइप, विहीर, शेत आणि गवतात लपवून ठेवला होता.
हा मुद्देमाल शोधण्यासाठी बीडीडीस, श्वान आणि डीएसएमडी पथकाची मदत घेण्यात आली. मेटल डिटेक्टरच्या मदतीने लपवलेले सोने सापडले. दरम्यान, मुख्य आरोपीला चोरीचा मुद्देमाल लपवण्यास मदत केल्याप्रकरणी त्याच्या कुटुंबालाही अटक करण्यात आली आहे.
पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल यांनी याप्रकरणी माहिती दिली. फिर्यादी दीपक माने यांचे राज कास्टिंग नावाचे दुकान आहे. त्यांना १ जानेवारी रोजी दुकानात चोरी झाल्याचे दिसले.
दुकानाची व तिजोरीची चावी वापरून चोरी झाल्याचा त्यांनी अंदाज वर्तवला. त्यानुसार सध्या कामाला असलेले आणि काम सोडून गेलेल्या कर्मचाऱ्यांची पोलिसांनी चौकशी सुरू केली.
दरम्यान, दुकानात काम करणारा आरोपी सुनील कोकरे हा आजी वारल्याचे सांगून दोन दिवसांपूर्वी गावाला गेला होता. मात्र, तांत्रिक विश्लेषणात तो पुण्यातच असल्याचे समजले, तर त्याचा मित्र अनिल गारळे हा मात्र पुणे सोडून गेल्याचे आढळले. यामुळे पोलिसांचा त्याच्यावरच संशय बळावला. त्यानुसार आरोपी सुनील कोकरे आणि त्याचा एक साथीदार तानाजी खांडेकर यांना सांगलीतील जत येथून ताब्यात घेण्यात आले. त्यांनी ही चोरी अनिल गारळे याच्या मदतीने केल्याचे सांगितले.
दरम्यान, गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने अनिल गारळे याला कोल्हापूर येथून ताब्यात घेतले होते. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी सुनील कोकरे याने शेतात आणि हत्ती घासमध्ये रोकड व सोने लपवले असल्याचे सांगितले.
त्याप्रमाणे तेथून सुमारे तीन किलो सोने व ७ लाख ७३ हजारांची रोकड जप्त करण्यात आली, तर सुनील कोकरे याच्या घरातून आणि शेतातून सुमारे अर्धा किलो सोने आणि दीड लाखाची रोकड हस्तगत करण्यात आली.
ही कारवाई परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल, सहायक आयुक्त अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा, पोलिस निरीक्षक (युनिट १) शब्बीर सय्यद, पोलिस निरीक्षक मंगेश जगताप, सहायक निरीक्षक वैभव गायकवाड, आशिष कवठेकर, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, सहायक उपनिरीक्षक, राहुल मखरे, अंमलदार मेहबूब मोकाशी, निर्मला शिंदे, प्रमोद मोहिते, गणेश दळवी, प्रवीण पासलकर, पंकज देशमुख, तुषार खडके आणि अजित शिंदे यांच्या पथकाने केली.