Pimpri Chinchwad: तोंडात गुटखा अन् ओठात सिगारेट, शाळकरी पोरांना टपऱ्यांचा विळखा

0
55

शाळा, महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास मनाई आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरात शाळांच्या आवारात खुलेआम टपऱ्यांवर गुटखा, सिगारेटची विक्री सुरू असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत दिसून आले.

या टपरीचालकांवर अन्न-औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभाग व महापालिका कारवाई करत नसल्याने शाळकरी मुले व्यसनांच्या विळख्यात अडकत आहेत.

तंबाखूजन्य पदार्थ तसेच सिगारेटची शाळा, महाविद्यालय किंवा शैक्षणिक संस्थेच्या १०० मीटरच्या अंतरात विक्री करण्यास ‘सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य उत्पादने विक्री कायदा २००३’ च्या कलम ६ (ब) नुसार बंदी आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांश शाळा व महाविद्यालयांजवळील पान स्टॉलवर तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी (दि. १७) ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने याबाबत पिंपरीतील शाळा परिसरामध्ये पाहणी केली. त्यामध्ये पिंपरीच्या कराची चौकात आर्य समाजाच्या शाळेजवळच टपरीवर तंबाखूजन्य पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याचे निदर्शनास आले.

पिंपरी गावातील नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या प्रवेशद्वारावरच शिवशंभू पान स्टॉल आहे. या स्टॉलवर शाळा सुटल्यानंतर सातवी-आठवीच्या विद्यार्थ्यांची गर्दी झाली. त्यापूर्वी एका शाळेतील मुलाने सिगारेटचे पाकीट घेत ते खिशात टाकले. त्यानंतर तिथे आलेल्या मुलाच्या घोळक्यामधील एक जण सिगारेटचे झुरके घेत असल्याचे दिसून आले.

शाळांच्या परिसरातच या पानटपऱ्या सुरू आहेत. मात्र, याकडे अन्न-औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभागासह महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. शाळांच्या परिसरामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये कारवाईच झाली नसल्याचे समोर आले आहे.

काही शाळांवर फलक, तरीही…

गुटखा, पान मसाला, सुगंधी तंबाखू आणि सुगंधी सुपारी विकण्यास बंदी आहे. या आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांची शाळा, महाविद्यालयाच्या १०० मीटरच्या परिसरात विक्री करण्यास कायद्याने बंदी घातली आहे. या कायद्याचे उल्लंघन करताना आढळल्यास २०० रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे फलक चिंचवडमधील शाळांच्या प्रवेशद्वारावर लावलेले आहेत. तरीही सर्रास विक्री सुरू आहे.

महापालिकेच्या शिक्षण विभागाने हात झटकले

शालेय परिसरात सुरू असलेल्या पानटपऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी महापालिकेच्या शिक्षण विभागाने क्षेत्रीय कार्यालयांवर सोपवली आहे. त्यामुळे कारवाई करण्याचे अधिकार क्षेत्रीय अधिकाऱ्यांना असल्याचे सांगत शिक्षण विभागाचे सहायक आयुक्त विजयकुमार थोरात यांनी हात वर केले. पिंपरीगावाचा समावेश असणाऱ्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी विनोद जळक यांनी, ‘मी नव्याने रुजू झालो असून आता एवढ्यात काही कारवाई केली नाही. तसेच यापूर्वी काही कारवाई केली आहे किंवा कोणाची तक्रार आहे का, याबाबत माहिती घेतो,’ असे सांगितले.

शाळेचे प्राचार्यही अनभिज्ञ

पिंपरी गाव येथील नवमहाराष्ट्र शाळेचे प्राचार्य दत्तात्रय गाढवे यांनी आपल्या शाळेच्या परिसरात अशाप्रकारे तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत नसल्याचे सांगितले. मात्र, प्रत्यक्षात शाळेच्या प्रवेशद्वारावरच तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरू असल्याचे दिसून आले. त्यामुळे या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी शाळेच्या प्राचार्यांनाही गांभीर्य नसल्याचे समोर आले.

अधिकार अनेकांना; पण कारवाई नाहीच!

शाळेच्या आवारामध्ये सुरू असलेल्या पान टपऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार शाळेच्या मुख्याध्यापकांना आहेत. याशिवाय शासकीय रुग्णालयातील अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभागालाही हे अधिकार आहेत. कारवाई करण्यासाठी एवढ्या विभागांना अधिकार असतानाही सगळे गप्प असल्याचे समोर आले आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे हात वर

अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त सुरेश अन्नापुरे यांनी, ‘मी रजेवर असून याबाबत प्रतिक्रिया दिल्यास मला विचारणा होईल’, असे सांगत प्रतिक्रिया देण्याचे टाळले. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी शहरात कारवाई झाली नसल्याचे सांगत पुढे बोलणे टाळले. नंतर प्रतिसादही दिला नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here