मणिपूरच्या तेंगनौपाल जिल्ह्यातील मोरेह येथे सकाळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या वाहनावर हल्ला केला. यामध्ये दोन जवान शहीद झाले. याशिवाय कुकी समाजातील एका महिलेला आपला जीव गमवावा लागला.
हल्लेखोर कुकी समाजातील आहेत. या हल्ल्यात तीन जवान गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी सांगितले की, बुधवारी सकाळी मोरेहमध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. मोरेह एसबीआयजवळील सुरक्षा चौकीवर दहशतवाद्यांनी बॉम्ब फेकले आणि गोळीबार केला. दहशतवाद्यांनी तात्पुरत्या कमांडो पोस्टवर गोळीबार केला, ज्यामुळे जवळपास उभ्या असलेल्या अनेक वाहनांचे नुकसान झाले. सध्या तेंगनौपाल जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
पोलिस अधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी दाेन संशयितांना अटक करण्यात आल्यानंतर ४८ तासांत संशयित कुकी अतिरेक्यांनी सुरक्षा दलाच्या चौकीवर हा हल्ला केला आहे. अटक केलेल्यामध्ये एका पक्षातील कार्यकर्त्याचा समावेश आहे.
शस्त्रास्त्र चोरी : सीबीआयकडून पाच जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल
मणिपूरमधील जातीय संघर्षाशी संबंधित प्रकरणांचा तपास करणाऱ्या सीबीआयने मे २०२३ मध्ये पोलिस कर्मचाऱ्यांची शस्त्रे आणि दारूगोळा लुटल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.
आरोपपत्रात नाव असलेल्यांमध्ये मणिपूरच्या प्रतिबंधित पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) आणि कांगलेइपाक कम्युनिस्ट पार्टी (नोयोन)चा माजी सदस्य मोइरांगथेम आनंद सिंह आणि किशम जॉनसन, कोन्थौजम रोमोजीत मेइती, लौक्राकपम माइकल मंगांगचा आणि अथोकपम काजित यांचा समावेश आहे. इम्फाळमधील पांगेई येथील मणिपूर पोलिस प्रशिक्षण केंद्रातील पोलिस शस्त्रागार ४ मे रोजी लुटले होते. त्यावेळी राज्यातील बहुसंख्य मैतेई समुदाय आणि आदिवासी कुकी यांच्यात जातीय संघर्ष सुरू झाला होता.
राज्य सरकारने गृहमंत्रालयाकडे हेलिकॉप्टर मागितले
– सीमावर्ती शहरातील मोरेहमधील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन मणिपूर सरकारने बुधवारी गृहमंत्रालयाकडून हेलिकॉप्टरची मागणी केली आहे.
– राज्याचे गृह आयुक्त टी. रणजित सिंह यांनी गृहमंत्रालयाचे अतिरिक्त सचिव यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मोरेह या सीमावर्ती शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती ही चिंताजनक आहे. कारण, तेथे सतत गोळीबार होत आहे.
– वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती कधीही उद्भवू शकते. मणिपूर सरकारने गृहमंत्रालयाकडे किमान सात दिवसांसाठी हेलिकॉप्टर मागवले आहे