जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा बुरुज हलत असल्याचे जाणवल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोजक्यात वाक्यात नेते व कार्यकर्त्यांना अनुभवाचे डोस दिले. सत्तेच्या पटाकडे खेचल्या जाणाऱ्यांना लोकनेते राजारामबापूंच्या कार्याची आठवण करून देत विरोधात राहूनही कामे करता येतात, याचा इतिहास मांडला.
जयंत पाटील यांची उंची किती मोठी आहे, हे सांगत त्यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहनही केले. पवारांचा हा डोस जिल्ह्यात कामी येणार की, तो निकामी होणार हे पुढील काळात स्पष्ट होईल.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे वर्चस्व असलेल्या सांगली जिल्ह्यात पक्षाची पडझड होण्याची चिन्हे दिसत आहेत. माजी महापौर, नगरसेवकांसह अनेक पदाधिकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जयंतरावांच्या गडाला हादरे बसू लागले आहेत. संभाव्य पडझड रोखण्यासाठी शरद पवारांनी सांगलीतील कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना अनुभवाचे बाेल सांगितले. राज्याच्या राजकारणात जयंतरावांची उंची मोठी आहे, असे सांगून राजारामबापूंप्रमाणे त्यांच्याही पाठीशी राहण्याचे आवाहन त्यांना करावे लागले.
सत्तेच्या पटावर राहूनच कामे करता येतात, हा अनेकांच्या मनातील ग्रह काढून टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला. राजारामबापू बहुतांश काळ विरोधात राहिले. तरीही त्यांनी त्या काळात विकासकामे कशी केली, मतदारसंघाचा कायापालट कशापद्धतीने केला, याचा इतिहास मांडला. कामे होत नसल्याचे कारण सांगूनच अनेकांनी पक्षत्याग केला, पण ही पावले कशी चुकीची आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांचा हा अल्पसा प्रयत्न पक्षाची पडझड रोखण्यास उपयोगी ठरणार का हा उत्सुकतेचा विषय बनला आहे.
पुतण्याशी चर्चा अन् काकांचे स्वागत
अजित पवारांची भेट घेऊन आलेले सांगली, मिरज व कुपवाडमधील अनेक माजी नगरसेवक शरद पवारांच्या स्वागतासाठी सांगलीत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या नियोजनातही होते. त्यामुळेच शरद पवारांनी त्यांना हे अनुभवाचे बोल सांगितले असावेत, अशीही चर्चा रंगली आहे.
जयंतरावांकडून निष्ठेचा मंत्र
राजारामबापूंशी निष्ठा असणाऱ्या लोकांचा नावानिशी उल्लेख करून जयंतरावांनी निष्ठेला सलाम केला. बापूंवर प्रेम करणारे लोक कुठेही जाणार नाहीत, असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी गड मजबूत असल्याचे स्पष्ट केले.