प्रतिनिधी : प्राध्यापिका मेघा पाटील
आंतरराष्ट्रीय पातळीवरील इनरव्हील संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त आणि इनरव्हील डिस्ट्रिक्ट 317 च्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त कोल्हापुरात दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन ‘स्वर्ण बहार’ येत्या शनिवारी आणि रविवारी २० व २१ जानेवारी २०२४ रोजी हॉटेल सयाजी येथे आयोजित करण्यात आले आहे. या राष्ट्रीय परिषदेचे यजमान पद यंदा इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजला मिळालेले आहे. अशी माहिती डिस्ट्रिक्ट चेअरमन वैशाली लोखंडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
इनरव्हील हे सामाजिक बांधिलकी जोपासत समाजातील गरजू व्यक्तींना विविध उपक्रमातून मदत करणारे सामाजिक आणि सेवाभावी महिलांचे संघटन आहे. आंतरराष्ट्रीय इनरव्हील या संस्थेची स्थापना १९२४ साली झाली. तर डिस्ट्रिक्ट 317 या संघटनेची स्थापना १९७४ साली झाली. डिस्ट्रिक्ट 317 मध्ये इनरव्हीलचे सत्तर संघटना कार्यान्वित आहेत. यांचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक असे आहे. आंतरराष्ट्रीय शताब्दी वर्ष आणि सुवर्ण महोत्सवी वर्ष या दोन्हीचे औचित्य साधून या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याचे असोशिएनच्या माजी खजनिस विद्युत शाह यांनी सांगितले.
अधिवेशनासाठी दिल्लीहून संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रीती गुगनाणी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच परिषदेच्या पहिल्या दिवशी परिषदेच्या संयोजक आणि उद्योजिका उत्कर्षा पाटील यांच्या वतीने ४० जयपूर फूटचे वितरण आणि डिस्ट्रिक्ट 317 च्यावतीने १०० शिलाई मशीन आणि इनरव्हील सनराईज च्यावतिने ५० तृतीय पंथींना मेडीकल कीट, साडी, बांगड्या आणि गजरा देण्यात येणार आहे.
परिषदेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा व आसपासच्या परिसरातून ५०० जणांची नोंदणी पूर्ण झाली आहे. पत्रकार परिषदेस उत्कर्षा पाटील, ममता गद्रे, वसुधा लिंग्रज, रितू वायचळ,शर्मिला खोत, मनिषा जाधव, स्मिता खामकर आदी उपस्थित होते.