कोल्हापूर : काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचे शिरोळ तालुक्यावर विशेष लक्ष आहे, त्यांची कळ काढून चालत नसल्याचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी निमशिरगाव येथील जाहीर कार्यक्रमात सांगितले.
यावरून खासदार माने यांनी सतेज पाटील यांचा धसका घेतल्याची चर्चा बुधवारी दिवसभर सोशल मीडियात सुरू होती.
जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची ताकद मोठी आहे. सर्व तालुक्यांत त्यांचे गट असल्याने जय-पराजयाचे गणित ते बिघडवू शकतात. अलीकडील पाच वर्षांत त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणावर चांगलीच पकड निर्माण केल्याने त्यांना अंगावर घेणे सर्वपक्षीय नेते टाळतात. मंगळवारी, निमशिरगाव येथे डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या पुतळ्याचे अनावरण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते झाले. महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबरच महायुतीचे नेतेही उपस्थित राहिल्याने फटकेबाजी ऐकायला मिळणार हे निश्चित होते.
खासदार माने यांनी शरद पवार यांची स्तुती करतानाच सतेज पाटील यांच्याबाबतही वक्तव्य केले. सतेज पाटील यांचे शिरोळ तालुक्यावर विशेष लक्ष आहे. त्यांची कळ काढून चालत नाही, असे विधान केले. सतेज पाटील यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ‘आमचं ठरलयं’ असे जाहीर करून संजय मंडलिक यांना विजयी केले. शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांच्या कोल्हापूर दौऱ्यात त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलावून आगामी निवडणुकीची दिशा स्पष्ट केली. याची धास्ती खासदार माने यांनी घेतल्याची चर्चा सोशल मीडियात सुरू होती.