जन्मतारखेसाठी ‘आधार’ अमान्य, ईपीएफओने जाहीर केला निर्णय

0
50

जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधारकार्ड ग्राह्य धरले जाणार नाही, असे भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) नुकतेच जाहीर केले आहे. त्यासाठी ईपीएफओने एक अधिसूचना जारी केली आहे.

या अधिसूचनेनुसार, आधारकार्डला जन्मतारखेच्या पुराव्याच्या सूचीतून हटविण्यात आले आहे.

त्यामुळे आधारकार्ड जन्मतारखेचा पुरावा म्हणून ईपीएफओच्या कुठल्याही नोंदीत स्वीकारले जाणार नाही.

ईपीएफओच्या या निर्णयाचा परिणाम कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांवर होणार आहे. या निर्णयानंतर ईपीएफओ सदस्यांना जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधारकार्डचा वापर करता येणार नाही.

का घेण्यात आला हा निर्णय?
सूत्रांनी सांगितले की, आधार कायदा २०१६ मध्ये आधारकार्डला जन्मतारखेचा पुरावा म्हणून मान्यता देण्यात आलेली नाही तरीही अनेक ठिकाणी त्याचा जन्मतारखेसाठी वापर होत होता. ही बाब आधार प्राधिकरणाच्या लक्षात आल्यानंतर प्राधिकरणाने ईपीएफओला यासंदर्भात निर्देश दिले होते. त्यानुसार, ईपीएफओने हा निर्णय जाहीर केला आहे.

जन्मतारखेचा ग्राह्य पुरावा कोणता?
आधारकार्डला सूचीमधून बाहेर काढल्यानंतर पुढील दस्तावेज जन्मतारखेचा पुरावा म्हणून वापरता येतील
– जन्मदाखला
– मान्यताप्राप्त शाळेचे गुणपत्रक
– शाळा सोडण्याचा दाखला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here