Kolhapur: जोतिबावर उद्या श्रावणषष्ठी यात्रा; सांगली, सातारा, कऱ्हाड आगारातून जादा एसटी गाड्यांची सोय

0
102

जोतिबा : जोतिबा डोंगरावर चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा उद्या, मंगळवारी (दि. २२) होत असून, या यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात राज्यांतून सुमारे तीन लाख भाविक येतात.

बुधवारी (दि. २३) सकाळी सात वाजता धुपारती सोहळ्याने या यात्रेची सांगता होईल. देवस्थान समितीने यात्रेनिमित्त मंदिर परिसरात दर्शन मंडपामध्ये लोखंडी ग्रील, मॅटची व्यवस्था केली आहे. जोतिबा डोंगरावर रिकाम्या जागेत सपाटीकरण केले आहे. महावितरण कंपनीने पार्किंगच्या ठिकाणी विजेची व्यवस्था केली आहे.

यात्रेत भाविकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाणार आहे. प्लास्टिक मुक्तीवर भर देऊन कापडी पिशवी वापरण्याचे आवाहन केले आहे. सांगली, सातारा, कऱ्हाड या आगारातून एसटी महामंडळाने जादा एसटी गाड्यांची सोय केली आहे. यात्रेदिवशी केखले आरोग्य केंद्र तसेच जिल्ह्यातील इतर वैद्यकीय आरोग्य पथके भाविकांच्या सेवेसाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत.

जोतिबा ग्रामपंचायतीने संपूर्ण गावातून स्वच्छता व औषध फवारणी केली आहे. पिण्याचे पाणी शुद्ध करण्याचे काम पूर्ण झाले असून, डोंगरावर साथीच्या रोगांचा फैलाव होऊ नये म्हणून विशेष यंत्रणा सज्ज ठेवली आहे. यात्रेदिवशी सर्व मंदिरे दर्शनासाठी खुली असणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here