गँगस्टर शरद मोहोळ खून प्रकरणात पुणे पोलिसांनी अटक केलेल्या गुंड विठ्ठल शेलारची बुलेटप्रूफ स्कॉर्पिओ गाडी जप्त करण्यात आली आहे. पांढऱ्या रंगाची ही स्कॉर्पिओ गाडी विठ्ठल शेलार ने त्याच्या पुनावळे येथील फार्म हाऊसवर लपवून ठेवली होती.
मात्र गुन्हे शाखेच्या पोलिसांना या गाडी विषयी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती. तोपर्यंत विठ्ठल शेलार च्या साथीदारांनी ही गाडी इतरत्र हलवण्याचा प्लॅन केला होता.
विठ्ठलचे साथीदार ही गाडी घेऊन निघालेही होते. मात्र पोलीस आपल्या मार्गावर असल्याचे समजल्यानंतर त्यांनी गाडी रस्त्यात सोडून पळ काढला. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कार जप्त केली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत सहा महागड्या कार जप्त केल्या आहेत.
शरद मोहोळ खून प्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत 15 जणांना अटक केली आहे. अटकेत असलेल्या आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी आतापर्यंत क्रेटा, इंनोव्हा, फॉर्च्युनरसह ६ कार जप्त केल्या आहेत. आरोपींच्या गाड्यांविषयी माहिती घेत असतानाच पोलिसांना विठ्ठल शेलारच्या बुलेटप्रुफ कार विषयी माहिती मिळाली होती. मात्र पोलीस ही गाडी जप्त करतील या भीतीने त्यांनी लपून ठेवण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या होत्या.
मात्र पोलिसांना याची काही वेळातच माहिती मिळाली व पोलिसांनी तिचा पाठलाग सुरू केला. वाकड भागात ही कार आली असतानाच या कार घेऊन जाणाऱ्याना पोलीस मागावर असल्याचीही माहिती मिळाली. त्यांनी लागलीच कार रस्त्याच्या बाजूला सोडत पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी ही कार ताब्यात घेतली.
दरम्यान, कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याचा ५ जानेवारी रोजी त्याच्या राहत्या घराजवळ खून करण्यात आला होता. मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी गोळ्या झाडून खून केला होता. याप्रकरणात आता पर्यंत १५ आरोपीना अटक करण्यात आली आहे. तसेच ८ ते ९ जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
शरद मोहोळचा खून होण्यापूर्वी एक महिना आधी विठ्ठल शेलार आणि पाहिजे आरोपी गणेश मारणे यांच्यात मिटिंग झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गणेश मारणे टोळीचा सदस्य असलेला विठ्ठल शेलार हा मुळचा मुळशी तालुक्यातील उरवडे गावचा रहिवासी आहे.
त्याच्यावर खून, खूनाचा प्रयत्न, अपहरण आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. २०१४ मध्ये त्याच्यावर मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्याला अटकही झाली होती. २०१७ मध्ये त्याची जामीनावर सुटका करण्यात आली होती.
शरद मोहोळ याचे वर्चस्व मुळशी व परिसरात वाढले होते. कंपन्यांमधील कंत्राटे घेण्यावरुन शेलार आणि मोहोळ यांच्यात कुरुबुरी सुरु होत्या. काही महिन्यांपूर्वी मुंबई बंगलुरु महामार्गावरील राधा हॉटेल चौकात त्याने गोळीबार ही केला होता. विठ्ठल शेलार हा सुरुवातीपासून पोलिसांच्या रडारवर होता. शरद मोहोळचा खून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो गुन्हे शाखेत हजर झाला होता. त्यानंतर तो फरार झाला होता. त्याला पहाटे पनवेलहून ताब्यात घेतले आहे.