‘वर्क फ्रॉम होम’च्या नावाखाली दोघांची २० लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल

0
53

‘वर्क फ्रॉम होम’च्या नावाखाली दोघांची २० लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ आणि कोंढवा पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि. १९) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत कात्रज परिसरात राहणाऱ्या एका २८ वर्षीय तरुणाने पोलिसांत फिर्याद दिली. सुरज गोपाळ शेंडे असे फिर्यादीचे नाव आहे. हा प्रकार २८ नोव्हेंबर २०२३ ते १९ जानेवारी २०२४ दरम्यान घडला. अनोळखी मोबाइल क्रमांकावरून तक्रारदार तरुणाच्या व्हॉट्सॲपवर मेसेज आला. ‘वर्क फ्रॉम होम’द्वारे चांगले पैसे कमावता येतील, असा मेसेज केला. टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात मोबदला मिळेल, असे सांगून संबंधित कामाचे आणि पैसे कमावल्याचे स्क्रिनशॉट पाठवले.

त्यानंतर तरुणाला टेलिग्राम ग्रुपमध्ये ॲड करून वेगवेगळे टास्क दिले. सुरूवातीला टास्क पूर्ण केल्याचा चांगला मोबदला दिला आणि तरुणाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगत पैशांची गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळेल, असे सांगितले. तब्बल १५ लाख २३ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. पैसे भरूनही परतावा न मिळाल्याने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक दिघावकर करत आहेत.

दुसऱ्या घटनेमध्ये कोंढवा परिसरात राहणाऱ्या इम्रान शेख अब्दुल रौफ (३२) यांनी फिर्याद दिली आहे. पार्टटाइम जॉबचे आमिष दाखवत गुंतवणूक करण्यास भाग पडून ४ लाख ६४ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक दशरथ पाटील पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here