कोल्हापुरात तावडे हॉटेलजवळ सव्वादोन लाखांचा गुटखा पकडला; तिघांना अटक, कार जप्त

0
64

कोल्हापूर : कर्नाटकातून आणलेला दोन लाख ३४ हजार रुपयांचा गुटखा आणि सुगंधी सुपारी साताऱ्याच्या दिशेने घेऊन जाणारी कार अडवून पोलिसांनी गुटखा आणि कार असा सात लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली.

पुणे-बंगळुरू महामार्गावर तावडे हाॅटेल येथे गुरूवारी (दि. १८) रात्री ही कारवाई झाली. प्रसाद दत्तात्रय देसाई (वय २९), किरण आनंदा पोवार (वय ३०) आणि सूरजीत जयवंत घोरपडे (वय २५, तिघेही रा. शिवाजीनगर, हुपरी, ता. हातकणंगले) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कारमधून गुटखा आणि सुगंधी पान सुपारीची अवैध वाहतूक होणार असल्याचे समजले होते. त्यानुसार उपनिरीक्षक विनायक सपाटे यांच्या पथकाने तावडे हाॅटेल येथील सेवा रस्त्यावर सापळा रचून संशयित कार (एमएच ०२, ईई १०६९) पकडली. कारची झडती घेतली असता, त्यामध्ये दोन लाख ३४ हजार रुपयांचा गुटखा आणि सुगंधी सुपारी सापडली. गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या तिघांना ताब्यात घेऊन पोलिसांनी कारसह गुटखा जप्त केला.

कर्नाटकातून आणलेला गुटखा पुणे-बंगळुरू महामार्गावर दुसऱ्या व्यक्तीला पोहोचवायचा होता, अशी माहिती अटकेतील संशयितांनी पोलिसांना दिली. तिन्ही संशयितांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. न्यायालयात हजर केले असता, तिघांना मंगळवारपर्यंत (दि. २३) पोलिस कोठडी मिळाली.

उपनिरीक्षक सपाटे यांच्यासह पोलिस अंमलदार विलास किरोळकर, संजय हुंबे, कृष्णात पिंगळे, संजय पडवळ, सागर चौगुले, संतोष पाटील, किरण शिंदे आणि संतोष बरगे यांच्या पथकाने ही कारवाई केली. उपनिरीक्षक शेषराज मोरे अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here