मी रामाचा.. राम माझा ही प्रत्येकाची भावना; पालकमंत्र्यांनी केली अंबाबाई मंदिराची स्वच्छता

0
64

कोल्हापूर : अयोध्येत राम मंदिर व्हावे ही अनेक वर्षे देशवासियांची इच्छा होती ती आता पूर्ण होत आहे. राममूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त मनामनात राम आहेत. मी रामाचा राम माझा हीच प्रत्येकाची भावना आहे अशा शब्दात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी श्री राम मंदिर व मूर्ती प्रतिष्ठापनेच्या सोहळ्याबद्दल मनोगत व्यक्त केले.

डीप क्लीनिंग मोहिमेअंतर्गत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी श्री अंबाबाई मंदिर परिसराची स्वच्छता केली. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी यांनीही साफसफाई केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त केशव जाधव व रविकांत अडसूळ, उपायुक्त शिल्पा दरेकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव तथा उपविभागीय अधिकारी सुशांत बनसोडे, मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे, माजी नगरसेवक जयंत पाटील, आदिल फरास, विनायक फाळके, प्रकाश पाटील, रमेश पोवार, मुरलीधर जाधव, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच महानगरपालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री म्हणाले, राम मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त कागलमध्ये १ लाख कुटूंबांना निमंत्रण, देवालयांचे माहिती पुस्तक पाठवले आहे. कागलमध्ये अनेकविध उपक्रम घेतले जाणार आहे.

असाही विरोधाभास..
अंबाबाई मंदिराच्या बाह्य परिसरात कांचीपुरम रफ ग्रॅनाईट प्रकारातील खडबडीत फरशी आहे. अशी फरशी मॉपने पुसता येत नाही. किंबहुना ती पुसली जात नाही. मंदिर आवारही अगदी स्वच्छ होते. पण पालकमंत्र्यांसह अधिकारीही अगदी मन लाऊन फरशी पुसल्याचे व स्वच्छता केल्याचे छायाचित्र व्हायरल झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here