मालदीवमधील भारतद्वेष्ट्या सरकारच्या असंवेदनशीलतेमुळे एका १४ वर्षीय मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. भारतात उपचारासाठी नेले जाण्यासाठी भारताने उपलब्ध करून दिलेल्या एअर ऍम्ब्युलन्सला अध्यक्ष मोहमद मोइझ्झू यांच्या प्रशासनाने अनुमती नाकारल्यामुळे या मुलाला उपचाराअबावी जीव गमवावा लागला.
भारताकडून हेच विमान मालदीवमधील मानवतावादी मदतीसाठी फार पूर्वीपासून वापरले जात होते, असे असतानाही, ही परवानगी नाकारली गेली होती, हे विशेष आहे.
मालदीवमध्ये अलिकडेच सत्तेवर आलेल्या मोइझ्झू यांनी मालदीवमध्ये तैनात असलेले भारताचे सर्व सैन्य परत जात नाही, तोपर्यंत भारताच्या सर्व डॉर्निअर विमानांची उड्डाणे थांबवण्याचे आदेश दिले आहेत. म्हणूनच या विमानाला परवानगी नाकरली गेली होती.
मालदीवमधील १४ वर्षीय मुलाला ब्रेन ट्युमर झाला होता. त्याला उपचारांसाठी गाफ अली मिलिंग्ली येथून राजधानी माले येथील इंदिरा गांधी मेमोरियल रुग्णालयात न्यायचे होते. या मुलाची प्रकृती बिघडल्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात हलवणे आवश्यक होते. म्हणून या मुलाच्या कुटुंबीयांनी एअर ऍम्ब्युलन्सची मागणी केली होती. रुग्णसेवेसाठी भारताचे डॉर्निअर विमान उपलब्ध होते. मात्र भारताबरोबर उच्चस्तरिय तणाव असल्यामुळे मोइझ्झू यांच्या प्रशासनाने हे विमान वापरण्यास अनुमती नाकारली. त्वरित रुग्णालयात हलवले न गेल्यामुळे या मुलाचा मृत्यू झाला.
मालदीवच्या हवाई वाहतूक प्राधिकरणाकडे वारंवार विमानाच्या व्यवस्थेबद्दल विचारणा केल्यानंतरही योग्य उत्तर दिले गेले नव्हते, अशी टीका या मुलाच्या कुटुंबीयांनी केली आहे.मालदीवमधील खासदार मिकाइल नसीम यांनीही अध्यक्ष मोइझ्झू यांच्या दोरणांवर टीका केली आहे. अध्यक्षांना भारताबद्दल राजकीय आसुया वाटत असेल. पण त्याबद्दल देशातील नागरिकांच्या जीवाशी खेळले जायला नको, असे नसीम यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्विपला पर्यटकांनी भेट देण्याचे आवाहन केल्यावर मालदीवमधील तीन मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींवर सोशल मीडियावरून असभ्य भाषेत टीका केली होती. भारताकडून याबद्दल मालदीवच्या उच्चायुक्तांकडे तक्रार केली गेल्यावर या तिन्ही मंत्र्यांना तातडीने बडतर्फ केले गेले होते. तेंव्हापासून मालदीव आणि भारतातील उच्चस्तरिय संबंध बिघडले आहेत.