संपूर्ण देश राममय झाला असताना हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन आज साजरा होत आहे. पण, ‘शिवसेनाप्रमुख’ या पदातील शिवसेना पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भारतीय जनता पक्षाने सध्या महाराष्ट्रद्रोही गुलामांच्या हाती सोपवली आहे.
सत्तेच्या क्षणिक तुकड्यांसाठी ‘आई’चा सौदा करावा, तसा शिवसेनेचा सौदा ज्यांनी केला त्यांच्या हस्ते अयोध्येत रामाची प्राणप्रतिष्ठा झाली, हे बरे नाही, असे टीकास्त्र ठाकरे गटाने सोडले.
–Sanjay Raut : शिवसेना नसती तर अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठाच… संजय राऊतांचा हल्लाबोल
शिवसेनाप्रमुखांचे अस्तित्व हे सत्य आणि नैतिकतेच्या राजकारणाचे बलस्थान होते. आज आपल्या देशातून सत्य आणि नैतिकतेचे उच्चाटन झाले आहे. राष्ट्रभक्तीचा गोवर्धन करंगळीवर पेलून धरायला शिवसेनाप्रमुख नाहीत. पण छत्रपती शिवाजी महाराजांनंतरही महाराष्ट्र मोगलांशी लढत राहिला आणि शेवटी औरंगजेबाला याच मातीत गाडले. शिवसेनाप्रमुखांच्या महानिर्वाणानंतरही महाराष्ट्र लढतच आहे आणि महाराष्ट्राचे लचके तोडणाऱ्या नव्या मोगलांना तो याच मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखातून दिला आहे.
शिवसेनाप्रमुख ही पदवी किंवा उपाधी नव्हती, तर ते एक तेजोवलय होते. सत्तेपेक्षा संघटनेचे बळ किती मोलाचे आणि संघटनेत काम करणाऱ्या शिवसैनिकांच्या निष्ठा व त्याग किती महत्त्वाचा, हे त्यांनी देशाला दाखविले. लाखो निष्ठावंतांचा सागर त्यांच्या एका इशाऱ्यावर उसळून बाहेर पडत असे आणि देशाच्या राजकारणाची दिशा त्यामुळे बदलत असे. हा इतिहास कधीच पुसला जाणार नाही, असेही ठाकरे गटाने म्हटले आहे.
Balasaheb Thackeray : …आज शिवसेनाप्रमुख हवेच होते, ठाकरे गटाचे भाजपावर शरसंधान
हिंदुत्व म्हणजे खोमेनी छाप धर्मांधता नाही, असा विचार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मांडला होता. पण देश ‘राममय’ करताना त्या हिंदुत्वात धर्मांधतेची अफू मिसळली जात असेल तर हा महान भारत देश पुन्हा जंगलयुगात जाईल. देशाचे जंगल होताना पाहणे दुर्दैव आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी ते जंगलच पेटवले असते. तरीही बाळासाहेबांच्या विचारांच्या ठिणग्या जंगलराज्यात उडत आहेत. या ठिणग्याच जंगलराजला चूड लावतील! बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या ठिणग्या म्हणजे निखाराच आहे. त्या कशा विझतील? असा सवाल ठाकरे गटाने केला आहे.