: ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ हे राज्य शासनाचे महत्वाकांक्षी अभियान असून या अभियानांतर्गत कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी हा कालावधी अनुकूल आहे. त्यामुळे या अभियानात कृषी विभागाचा सहभाग वाढवीत कामांना गती द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जलयुक्त शिवार अभियान २.० चा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “जलयुक्त शिवार अभियानासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. जो जिल्हा अधिक वेगाने कामे करेल, त्या जिल्ह्याला अधिक निधी दिला जाईल. लातूर, भंडारा, सोलापूर, सांगली, पुणे या ५ जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा वेगाने प्रगती झाली आहे. इतर जिल्ह्यांनीही कामे अधिक वेगाने करावीत.”
जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील यश लक्षात घेता, राज्य शासनाने ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ चा दुसरा टप्पा सुरू केला आहे. ज्यामध्ये पाणलोट विकास उपक्रमांच्या विविध कामांचा समावेश आहे, यामुळे पावसावर आधारित शेतीच्या समस्या कमी होण्यास मदत होऊन शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यास मदत होणार आहे.