प्रतिनिधी:अभिनंदन पुरीबुवा
बिहारच्या राजकारणात पुन्हा उलथापालथ होऊन नवी समीकरणं पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपालांची भेट घेत राजीनामा दिला आहे. नितीश यांनी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची साथ सोडली आहे. आज २८ जानेवारी संध्याकाळी ते पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. भाजपच्या पाठिंब्यानं ते सरकार स्थापन करतील. भाजप बिहार विधानसभेतील सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे. नितीश कुमार भाजपा सोबत जात असल्यानं विरोधी इंडिया आघाडीला जोरदार धक्का बसला आहे.महागठबंधनची साथ सोडून भाजपसोबत जात असलेले नितीश कुमार आज संध्याकाळी ४ वाजता पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. तसं झाल्यास ते नवव्यांदा मुख्यमंत्री होतील. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आता थोड्याच वेळात भाजपचे आमदार राज्यपालांकडे पाठिंब्याचं पत्र घेऊन पोहोचतील. यानंतर एनडीए सरकारच्या स्थापनेची प्रक्रिया सुरू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवरुन संवाद साधल्यानंतरच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली.लालू प्रसाद यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत नितीश कुमारांचा संयुक्त जनता दल सत्तेत होता. राज्यातील सर्वात मोठा पक्ष असलेला राजद जेडीयूचे आमदार फोडण्याच्या तयारीत असल्याचं नितीश कुमार यांना वाटत होतं. त्यामुळे त्यांनी राजदची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. नितीश कुमार यांनी राजदच्या नेतृत्त्वाचे फोन घेणं बंद केलं. त्यामुळे ते भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा जोर होऊ लागली होती. नितीश कुमार यांचं बेभरवशी राजकारण पाहता भाजपनं सावध पवित्रा घेतला. नितीश यांनी राजीनामा द्यावा, मग त्यांना पाठिंबा देऊ, असा पवित्रा भाजपनं घेतला. तर जदयूच्या नेत्यांनादेखील भाजपवर शंका होती. भाजपनं आधी पाठिंब्याचं पत्र द्यावं. मग नितीश यांनी राजीनामा द्यावा, असं मत जेडीयूतील नेत्यांचं होतं. त्यामुळे वेगळाच पेच निर्माण झाला. अखेर नितीश कुमार यांनी राजीनामा दिला. आता नव्या सरकारमध्ये भाजप सहभागी होणार की नितीश सरकारला केवळ बाहेरुन पाठिंबा देणार ते पाहणं महत्त्वाचं असेल.