कोल्हापूर : मराठा योध्दा मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मुंबईत धडक दिली. त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातून सर्व जिल्ह्यातील मराठा समाजाचे कार्यकर्ते मुंबईत धावले.
शनिवारी सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य करताच कोल्हापुरातून चित्ररथ घेऊन मुंबईत पोहोचलेले शिवशाहीर दिलीप सावंत यांचा डफ कडाडला आणि मराठा आरक्षणाचा विजयी पोवाडा मुंबईत घुमला. या विजयाच्या साक्षीदाराला राज्यभरातून आलेल्या मराठा कार्यकर्त्यांनी त्यांना आवेशात साथ दिली.
जरांगे-पाटील हे मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत होते, त्यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारने शनिवारी मान्य केल्या, तसा अध्यादेशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्याकडे सुपूर्द केला. त्यामुळे एकीकडे मराठा समाजाचा जल्लोष सुरु असताना दुसरीकडे मराठा आरक्षणासंदर्भात झालेला निर्णय कोल्हापुरातील मराठा समाजातील नेत्यांनी तो मान्य केला नाही. मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळाले पाहिजे या भूमिकेशी आम्ही आजही ठाम आहोत, अशी भूमिका कोल्हापुरातील नेत्यांनी जाहीर केली आहे.
दरम्यान, शिवशाहीर दिलीप सावंत यांचा विजयी मराठा आरक्षणाचा पोवाडा मुंबईत घुमला. त्यांना शाहीर भगवान आबंले, रत्नाकर कांबळे, मारुती रणदिवे, झिलकरी सुदर्शन ढाले, कीबोर्डवर योगेश केदार, ढोलकी वादक दत्ता पवार यांनी संगीतसाथ केली.