अभिनेता पुष्कर जोग यानं मराठा जातीय सर्वेक्षणासाठी आलेल्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानावरून चांगलाच गदारोळ झाला आहे. पुष्करला चांगलंच ट्रोल करण्यात आलंय.
या संपूर्ण प्रकाराबाबत पुष्करनं दिलगिरी देखील व्यक्त केली आहे. या प्रकरणात प्रसिद्ध मराठी अभिनेता अभिजीत केळकर मात्र चांगलंच संतापला आहे. पुष्करच्या वादग्रस्त व्यक्तव्यावरून अभिजीतनं पुष्करला चांगलंच झापलं आहे.
अभिनेता अभिजीत केळकर यानं सोशल मीडियावर पुष्करसाठी खास पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यानं पुष्करला त्याच्या वादग्रस्त विधानावरून चांगलंच झापलं आहे. तसंच त्याला चार महत्त्वाचे प्रश्न देखील विचारले आहेत. अभिजीतची ही पोस्ट अल्पावधीतच व्हायरल झाली आहे.
अभिजीतनं पोस्टमध्ये लिहित म्हटलंय, “प्रिय मित्र पुष्कर जोग यांस, मित्रा,तुझी चर्चेत असलेली वादग्रस्त पोस्ट वाचली. ती सोशल मीडियावर होती त्यामुळे इथेच तुला पत्र लिहिण्याचा हा प्रपंच. मी महानगरपालिका कर्मचाऱ्याचा मुलगा आहे, ज्याचा मला सार्थ अभिमान आहे. माझी आई महानगरपालिकेत शिक्षिका होती. तिच्याबरोबर,तिला, तीच्या मैत्रिणींना मदत म्हणून मी अनेकदा जनगणना, सर्वेक्षण, प्रौढ शिक्षण ह्या कामात,अनेक वर्ष तिच्याबरोबर गेलो आहे,मदत केली आहे.”
अभिजीतनं पुढे म्हटलं, “उन्हातान्हात, पावसात सुध्दा फिरून ही कामं करावी लागतात. वरून आदेश आला की त्याची अंमलबावणी करणं एवढंच त्यांचं काम असतं. दिलेल्या फॉर्मवर असलेले प्रश्न विचारावे लागतात ते काही त्यांच्या मनातले नसतात.”
आपली जात सांगायची लाज का वाटावी किंवा कोणी ती विचारल्यावर राग का यावा? असा प्रश्न अभिजीतनं पुष्करला विचारला आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिकेचा कर्मचारी पुरुष असता तर तू खरंच लाथ घातली असतीस? असा सवाल देखील त्यानं पुष्करला केला आहे.
अभिनेता पुष्कर जोगच्या वादग्रस्त्र पोस्टनंतर अनेकांचा भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे त्याला प्रचंड ट्रोल देखील करण्यात आलं. यावर त्यानं दिलगिरी व्यक्त केली. त्यानं पोस्ट शेअर करत म्हटलं, “पोस्टचा हेतू हा फक्त आणि फक्त हेच सांगण्याचा होता की, मी केवळ माणूसकी हाच धर्म मानतो.”
“अर्थात व्यक्त होताना बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल जे विधान माझ्याकडून गेलं त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो कारण ते कर्मचारी त्यांना दिलेलं काम करत होते. वैयक्तिक बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल माझ्या मनात आदराचीच भावना आहे. माझ्या विधानामुळे ते दुखावले गेले असतील तर पुन्हा एकदा दिलगिरी”