कोल्हापूर:(प्रतिनिधी )प्रियंका शिर्के-पाटील
दुर्गापूर (चंद्रपूर) : बाहेर फिरायला नेतो, असे सांगून तीन नराधमांनी आळीपाळीने एका १४ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना शनिवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. दुर्गापूर पोलिसांत तक्रार दाखल होताच तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
गौरव रमेश शंखावार (वय २१, रा. इंदिरानगर), आशिक संदीप उराडे (१९, रा. रामकृष्ण चौक वानखेडे वाडी तुकुम), सर्वेश सुरेश हिवराळे (२२, रा. टाकनगर, अंजनगाव सुर्जी अमरावती, हल्ली मुक्काम जुने पोलिस वसाहत क्वाॅर्टर नंबर ५, तुकुम) असे अटकेतील आरोपींचे नाव आहेत.
१९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता पीडित मुलीची आई आपल्या कर्तव्यावरून घरी आली. दरम्यान, तिची १४ वर्षीय मुलगी घरी आढळून आली नाही. वाट बघून बराच वेळ उलटून गेल्यानंतरही ती घरी परतली नाही. परिसरात व नातेवाइकांकडे शोधाशोध केली. मात्र, ती कुठेच मिळाली नाही. म्हणून आईने शनिवारी दुर्गापूर पोलिस स्टेशन गाठून मुलीला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद नोंदवली. यावरून दुर्गापूर पोलिसांनी कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरवली.
रविवारी त्या मुलीचा शोध लागला. तिने महिला पोलिसांसमक्ष आपबीती सांगितली. लगेच पोलिसांनी मुलीवर अत्याचार करणाऱ्या गौरव शंखावार, आशिक उराडे, सर्वेश हिवराळे यांच्यावर कलम ३६३, ३७६ डीए भा.द.वि सहकलम ४ बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास दुर्गापूरचे ठाणेदार अनिल जिट्टावार करीत आहेत.
दोन वेगवेगळ्या ठिकाणी केला अत्याचार
पीडित मुलगी पोलिसांना सापडल्यानंतर रामनगर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक लता वाढीवे यांनी तिचे पंचासमक्ष बयाण नोंदविले. यावेळी १९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान सर्वेश हिवराळे, गौरव शंखावार यांनी तिला एका रूममध्ये नेले. दरम्यान आतून दरवाजा बंद करून सर्वेश हिवराळे याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर दुपारी आशिक उराडे व गौरव शंखावार यांनी पीडित मुलीला दुसऱ्या एका रूमवर नेऊन आळीपाळीने अत्याचार केल्याचे सांगितले.
आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी
दुर्गापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून तिघांनाही अटक केली. दुपारी पोलिसांनी तिघांना न्यायालयात हजर केले असता, न्यायधीशांनी तिघांनाही २४ ऑगस्टपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास दुर्गापूरचे पोलिस निरीक्षक अनिल जिट्टावार करत आहेत.