दहावी, बारावीत ५० टक्के गुणांची अट; मुक्त विद्यापीठाच्या पदवीधारकांना ‘स्वाधार’ मिळेना

0
70

 दहावी, बारावी आणि पदवी शिक्षणात ५० टक्के किंवा त्याहून अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांनाच ‘स्वाधार’ शिष्यवृत्ती देण्याचा नियम आहे. मुक्त विद्यापीठाचे काही पदवीधारक या नियमात बसत नसल्यामुळे समाजकल्याण विभागाने त्यांना अपात्र केले आहे.

दरम्यान, अशा विद्यार्थ्यांना भारत सरकारची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती मिळते, मग ‘स्वाधार’चा लाभ का नाही, असा जाब परिवर्तनवादी चळवळीच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारला आहे.

परिवर्तनवादी चळवळीचे अध्यक्ष राहुल मकासरे यांचे म्हणणे आहे की, मुक्त विद्यापीठाची पदवी घेतल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. यापैकी अनेकांना वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी समाजकल्याण कार्यालयाकडे ‘स्वाधार’ शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला. मात्र, वर्ष होत आले तरीही या विद्यार्थ्यांचा ‘स्वाधार’ शिष्यवृत्तीसाठी विचार झालेला नाही, याचा जाब समाजकल्याण अधिकाऱ्यांंना विचारण्यात आला. जर ८ फेब्रुवारीपर्यंत या शिष्यवृत्तीचा विचार झाला नाही, तर समाजकल्याण कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा मकासरे यांनी दिला आहे.

दरम्यान, समाजकल्याण विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, नियमानुसार ‘स्वाधार’ शिष्यवृत्तीसाठी दहावी, बारावी आणि पदवी शिक्षणात ५० गुण किंवा त्याहून अधिक गुण मिळणे आवश्यक आहे. मात्र, दहावी किंवा बारावीचे शिक्षण न घेताच काहींनी केवळ प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून मुक्त विद्यापीठात पदवीचे शिक्षण घेतले आहे. त्यामुळे आम्ही विभागीय शिक्षण मंडळाकडे दहावी- बारावीची परीक्षा आणि मुक्त विद्यापीठाची प्रवेश परीक्षा या सारख्याच आहे का, याचे मार्गदर्शन मागविणार आहोत. त्यानंतर समाजकल्याण आयुक्तालयाकडेदेखील यासंबंधीचे मार्गदर्शन घेत आहोत. तोपर्यंत या विद्यार्थ्यांना अपात्र यादीत टाकण्यात आले आहे.

चालू शैक्षणिक वर्षाचे ८ हजार अर्ज
चालू शैक्षणिक वर्षासाठी (२०२३-२४) विद्यार्थ्यांकडून ‘स्वाधार’साठी अर्ज मागविण्यात आले असून आतापर्यंत ८ हजारांहून अधिक अर्जांचे वितरण झाले असून अनेक अर्ज प्राप्तही झाले आहेत. १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज वितरण व जमा करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. याशिवाय, सन २०२२-२३ वर्षातील २३८० विद्यार्थ्यांची १० कोटी ८७ लाख रुपयांची ‘स्वाधार’ शिष्यवृत्तीची बिले कोषागार कार्यालयात दाखल करण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here