बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी पाटील यांना देशाच्या साखर उद्योगातील अग्रगण्य संस्था असलेल्या चिनीमंडी या संस्थेकडून प्रतिष्ठेचा शुगर अँड इथेनॉल इंटरनॅशनल अॅवॉर्डस् (एसइआयए) हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
नवी दिल्ली येथील ग्रँड हयात येथे झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
माजी आमदार के. पी. पाटील हे बिद्री सहकारी साखर कारखान्यात तब्बल ४० वर्षे संचालक तसेच १९ वर्षे अध्यक्षपदी आहेत. या काळात त्यांनी उस उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी उच्चांकी उसदर दिला आहे. याशिवाय कारखान्याचे गाळप विस्तारीकरण आणि सहवीज प्रकल्प यशस्वीपणे पार पाडले आहे. इथेनॉल प्रकल्पही अंतिम टप्प्यात असून लवकरच यातून प्रत्यक्ष उत्पादन सुरु होणार आहे. त्यांच्या दुरदृष्टीमुळे कारखान्याला आजवर राज्य आणि देशपातळीवरील विविध पुरस्कारांनी अनेकवेळा सन्मानित करण्यात आले आहे.
उस उत्पादक शेतकऱ्यांना दिलेला सर्वाधिक उसदर आणि साखर कारखानदारीतील योगदानाची दखल घेत अध्यक्ष के. पी. पाटील यांची साखर उद्योगातील प्रथितयश संस्था असलेल्या चिनीमंडी या संस्थेने २०२४ च्या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली. पुरस्कार वितरणावेळी संस्थेचे संस्थापक व सीईओ यु. पी. शहा यांच्यासह देशभरातील साखर उद्योगातील तज्ञ मान्यवर उपस्थित होते.
के. पी. यांच्या साधेपणाने वेधले सर्वांचे लक्ष
नवी दिल्लीतील ग्रँड हयात येथील पुरस्कार वितरण कार्यक्रमावेळी देशभरातून आलेल्या साखर उद्योगातील अनेक मान्यवरांची मांदियाळी होती. पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला ही सर्व मंडळी सुटा-बुटात आलेली असताना पांढरा शर्ट, पांढरी विजार आणि डोक्यावर पांढरी गांधी टोपी परिधान केलेल्या के. पी. पाटील यांच्या साधेपणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.