कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहत येथे बुधवार, ३१ जानेवारी रोजी सकाळी अनधिकृत मदरशाचे अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या शासकीय अधिकाऱ्यांशी हुज्जत घालून जमाव बंदीचे उल्लंघन केल्याबद्दल, तसेच महापालिकेला घेराव घातल्याबद्दल लक्ष्मीपुरी पोलिसांनी सुमारे सहाशेहून अधिक संशयितांवर गुन्हा दाखल केला.
यात गणी आजरेकर यांचाही समावेश आहे. पोलिसांच्या सूचनांचे उल्लंघन केल्याबद्दल संशयितांवर कायदेशीर कारवाई होणार आहे.
लक्षतीर्थ वसाहत येथील अलिफ अंजुमन मदरसा आणि सुन्नत जमातीचे अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकासह पोलिस आणि महसूल विभागाचे अधिकारी बुधवारी सकाळी गेले होते. मात्र, गणी आजरेकर यांच्यासह परिसरातील महिला आणि मुस्लीम तरुणांनी कारवाईला विरोध करून मदरशासमोर ठिय्या मारला.
आजरेकर यांनी जमावाला चिथावणी देऊन महापालिकेला घेराव घालण्यास फूस लावली. काही तरुणांनी हुज्जत घालत पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. जमाव बंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केला. शासकीय कामात अडथळा करून रस्त्यांवरील वाहतुकीचा खोळंबा केला.
पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून महापालिकेला घेराव घातला. यामुळे शहरात ठिकठिकाणी तणाव निर्माण होऊन धार्मिक द्वेष वाढल्यामुळे पोलिसांनी सुमारे ६०० जणांवर शनिवारी (दि. ३) गुन्हा दाखल केला. संशयितांवर पुढील कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.